कचऱ्याच्या विषारी धुराने त्रस्त नागरिक अखेर उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST2021-08-13T04:20:47+5:302021-08-13T04:20:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या ९ वर्षांपासून मनपाच्या बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणाहून निघणाऱ्या कचऱ्याच्या विषारी धुराने त्रस्त ...

Citizens, plagued by toxic fumes, finally took to the streets | कचऱ्याच्या विषारी धुराने त्रस्त नागरिक अखेर उतरले रस्त्यावर

कचऱ्याच्या विषारी धुराने त्रस्त नागरिक अखेर उतरले रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या ९ वर्षांपासून मनपाच्या बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणाहून निघणाऱ्या कचऱ्याच्या विषारी धुराने त्रस्त असलेले नागरिक अखेर रस्त्यावर उतरले. गुरुवारी चंदू अण्णा नगर व पवार पार्कमधील रहिवाशांनी हा प्रकल्प इतर ठिकाणी हलविण्याची मागणी करीत, प्रकल्पाच्या ठिकाणी जाणाऱ्या घंटागाड्या व कचऱ्याने भरून जाणारे ट्रॅक्टर रोखून आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत महापौर जयश्री महाजन व उपमहापौरांनी रहिवाशांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणावर पडलेल्या कचऱ्याला आग लागून त्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक या समस्येने त्रस्त आहे. गुरुवारी या नागरिकांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी रस्त्यावर उतरून आपला आक्रोश व्यक्त केला आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी जाणाऱ्या घंटागाड्या व ट्रॅक्टर अडवून चंदू अण्णा नगर व पवार पार्कमधील रहिवाशांनी रास्तारोको आंदोलन केले. यामुळे या रस्त्यावर ट्रॅक्टर व घंटागाड्यांचा लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत मनपा अधिकारी व पदाधिकारी या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय या भागातील रहिवाशांनी घेतला.

निवेदन, आंदोलन करूनही झाला नाही उपयोग

रहिवाशांनी मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा उदासीन भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. घनकचरा प्रकल्पाच्या धुरामुळे या भागातील नागरिकांना घरे विक्री करण्याची वेळ आली आहे. अनेकवेळा आंदोलने करून, मनपा प्रशासनाला निवेदने देऊनदेखील कोणतीही दखल मनपा प्रशासन घ्यायला तयार नसल्याने एकही वाहन प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊ न देण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला. महापौर व मनपा प्रशासनाचे अधिकारी आंदोलनस्थळी येणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला.

महापौर, उपमहापौरांनी दिली भेट

रहिवासी आक्रमक झाल्यानंतर तासाभरानंतर महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आंदोलनस्थळी जाऊन रहिवाशांची भेट घेतली. यावेळी रहिवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत, घनकचरा प्रकल्प याठिकाणाहून इतरत्र ठिकाणी करण्याची मागणी केली. अशाचप्रकारे विषारी धुराचा सामना केला तर याठिकाणचे रहिवासी आजाराने मरतील किंवा घरे विकतील अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. रहिवाशांच्या मागणीप्रमाणे महापौरांनी मनपा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून, यावर तोडगा काढण्याचा सूचना दिल्या. तसेच चंदू अण्णा नगर व पवार पार्कमधील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचेही आश्वासन महापौरांनी दिल्यानंतर रहिवाशांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, पंधरा दिवसांत तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Citizens, plagued by toxic fumes, finally took to the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.