चॉपरने केक कापणे आले अंगलगट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 20:07 IST2019-06-26T20:07:01+5:302019-06-26T20:07:24+5:30
वाढदिवशी ‘पराक्रम’ : पोलिसांनी दिली समज

चॉपरने केक कापणे आले अंगलगट !
फत्तेपूर, ता. जामनेर : येथील एका अल्पवयीन मुलाने आपल्या वाढदिवशी चॉपरच्या मदतीने केक कापल्याने त्याच्या चांगलेच अंगलगट आले आहे.
याबाबत जामनेर पोलिसांनी त्याचा खाकी पाहुणचार करुन त्याला समज दिल्याची घटना बुधवारी समोर आल्याने टवाळखोर तरुणांमध्ये या कारवाईमुळे धाक निर्माण झाला आहे. तर पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे
गेल्या दोन दिवसांपूर्वी अकरावीत शिक्षण घेणाऱ्या येथील एका अल्पवयीन मुलाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने चॉपरच्या सहाय्याने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आणि त्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले. नेमके हे फोटोे जामनेर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे आणि पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील यांच्या हाती लागले. त्यामुळे हा बहाद्दर कोण ? म्हणून पोलिसांनी बुधवारी त्याला पोलिस स्टेशनमध्ये आणले मात्र अल्पवयीन असून शिक्षण घेत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल न करता त्याला खाकी हिसका दाखवला. आणि गावातील काही नागरिक व पालकांसमोर त्याला समज देवून सोडून देण्यात आले.
दरम्यान या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा असून पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.