खडके येथील बालगृहाचे विभागीय स्पर्धांमध्ये यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 15:46 IST2020-01-12T15:45:26+5:302020-01-12T15:46:31+5:30
खडके येथील बालगृहातील विद्यार्थ्यांचे विभागीय स्तरात चमकदार कामगिरी केली.

खडके येथील बालगृहाचे विभागीय स्पर्धांमध्ये यश
कवठळ, ता.धरणगाव, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या खडके येथील बालगृहातील विद्यार्थ्यांचे विभागीय स्तरात चमकदार कामगिरी केली.
महिला व बालविकास विभाग विभागीय उपायुक्त आयोजित विभागीय स्तर चाचा नेहरू बालमहोत्सव ९ व १० रोजी पार पडला. त्यात बालगृह खडके बुद्रूक या संस्थेतील चिमुकल्यांनी यश संपादन केले. मोठ्या गटातील लाभार्थी हेमंत सुनील कोळी याने विभागीय स्तरावर बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच कविता वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक तर निरंक दिनेश सोनवणे याने कॅरम स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकावला.
लहान गटात किशोर राजेंद्र वानखेडे याने कॅरम स्पर्धेत व्दितीय क्रमांक आणि चित्रकला स्पर्धेतही व्दितीय क्रमांक मिळवला. बुद्धिबळ व कॅरमसाठी माजी प्रवेशित ॠषीकेश ठाकरे याने मेहनत घेतली.
मुलींच्या बालगृहातील लाभार्थी अंजली गाढे ही शुध्दलेखन स्पर्धेत लहान गटात प्रथम, तर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय आली. देविका परशुराम गायकवाड लहान गटातून निबंध स्पर्धेत व्दितीय आली. रुचिका गायकवाड चित्रकला स्पर्धेत तृतीय आली.
सामूहिक नृत्य प्रकारात लहान गटात ‘पापा मेरे पापा...’ या नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला. त्यात पायल गर्दे, अंजली गाढे, देविका गायकवाड, रूचिता गायकवाड, कुसुम पाटील, ममता पाटील यांचा सहभाग होता.
चिमुकल्यांचे विभागीय उपआयुक्त सुरेखा पाटील यांनी पारितोषिक व प्रमाणपत्र देवून सन्मानित केले. यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रभाकर यशवंत पाटील यांनी सर्व मुलांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करणारे अधीक्षक मधुकर कपाटे, प्रमोद पाटील, तुषार अहिरे, गणेश पंडित, ज्ञानेश्वर पाटील, ॠषीकेश ठाकरे, सारिका पाटील यांनी परिश्रम घेतले.