जळगाव शहरात घरासमोर खेळत असलेला बालक विजेच्या धक्क्याने ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 20:06 IST2019-06-26T20:05:13+5:302019-06-26T20:06:44+5:30
घरासमोर खेळत असतांना वीज प्रवाह उतरलेल्या लोखंडी खांबाला स्पर्श झाल्याने गुरु संतोष माळी (वय ३) या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता पिंप्राळामधील हुडको भागात घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जळगाव शहरात घरासमोर खेळत असलेला बालक विजेच्या धक्क्याने ठार
जळगाव : घरासमोर खेळत असतांना वीज प्रवाह उतरलेल्या लोखंडी खांबाला स्पर्श झाल्याने गुरु संतोष माळी (वय ३) या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता पिंप्राळामधील हुडको भागात घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरु हा बुधवारी दुपारी गल्लीत घरासमोर मुलांसोबत खेळत होता. घराजवळच असलेल्या वीजेच्या लोखंडी खांबात वीज प्रवाह उतरलेला होता. या खांबाला स्पर्श होताच त्याने जोरदार किंचाळी मारली. हा आवाज ऐकून घराबाहेर बसलेली आजी सुमनबाई व आई आशाबाई तातडीने त्याच्याकडे धावली. गुरुला जवळ घेतले असता त्याने खांद्यावर मान टाकली. ओठ व हाताची नखे काळे पडलेले होते. वडील संतोष माळी यांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणाचा तपास रामानंद नगर पोलीस स्टेशनचे हवालदार सतीश डोलारे व डोईफोडे करीत आहेत.
गुरुवारपासून जाणार होता शाळेत
संतोष माळी यांना उदय, गुरु हे दोन मुले तर लक्ष्मी मुलगी अशी तीन अपत्ये आहेत. गुरुला शाळेत प्रवेशाबाबत ख्वॉजामिया चौकातील शाळेत चौकशी केली होती. गुरुवारपासून तो शाळेत जाणार होता. गुरुला शाळेत सोडल्यानंतर वडील संतोष माळी हे मोठा मुलगा उदय याला आळंदी येथे घेऊन जाणार होते, मात्र तत्पूर्वीच ही घटना घडली.