Chieftains robbed with herbs in Madhapuri forest | चारठाणा मधपुरी जंगलात जडीबुटी देण्याच्या बहाण्याने लुटमार
चारठाणा मधपुरी जंगलात जडीबुटी देण्याच्या बहाण्याने लुटमार

ठळक मुद्देपाचही जणांना बेदम मारहाण३२ तोळे सोने व ५२ हजार रुपये लुटले लुटमार करणाऱ्या टोळ्या सक्रिय

मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : डायबेटीससाठी जडीबुटी देण्याचा विश्वास दाखवून मुंबई येथून बोलविलेल्या पाच इसमांना चारठाणा मधपुरी भागातील जंगलात नेऊन त्यांना बेदम मारहाण करीत त्यांच्या अंगावरील तब्बल ३२ तोळे सोने व ५२ हजार रोख रक्कम लुटली. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वढोदा वनहद्दीत घडली. या भागात बाहेरील लोकांना विविध दुर्मीळ वस्तू देण्याच्या नावाने विश्वास संपादन करून बाहेरील लोकांना बोलवतात आणि त्यांना मारहाण करून लुटमार करणाºया टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.
डायबेटीससाठी काळी हळद आणि जडीबुटी देतो, असा विश्वास संपादन करून पवार नामक इसमाने मुंबई येथील जटाशंकर गौड (वय ५३, रा.गोरेगाव मुंबई,) नागेंद्रप्रसाद ठिवर (वय ५२, रा.नालासोपारा, ईस्ट, जि.पालघर), भरत परमार (वय ५०, रा.कांदिवली वेस्ट, मुंबई), दीपक परमार (वय ५०, रा.मालाड ईस्ट, मुंबई) व अतुल मिश्रा (वय ३५, रा.गोरेगाव, मुंबई) यांना मुक्ताईनगर बोलविले. येथील रक्षा पेट्रोल पंपाजवळ हा संशयास्पद इसम त्यांना भेटला. औषध देतो, असे सांगून त्याने या पाचही जणांना चारठाणा मधपुरी परिसरात नेले. तेथे एका झोपडी वजा खोलीत बसविले. थंडपेयदेखील पाजले. औषध दाखवत असताना त्यांच्याच टोळीतील १० ते १५ जण तेथे दाखल झाले. त्यांनी या खोलीचे दार बंद केले आणि मुंबईच्या या पाचही इसमांच्या अंगावर हरणाचे चामडे टाकून तुम्ही हरणाचे चामडे घायला आले, असा बनाव करीत त्यांच्या टोळीतील पवार यास मारण्याचे नाटक केले आणि पाचही मुंबईकराना लाथाबुक्क्यांसह बांबूने बेदम मारहाण केली. त्यांच्या अंगावरील सोने, रोकड आणि मोबाइल हिसकावून पोबारा केला. यात जटाशंकर गौड याच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट, गळ्यातील चैन, हातातील अंगठ्या असा तब्बल ३२ तोळे सोने, ५२ हजार रोख आणि मोबाइल या लुटमारीत टोळीने पळवून नेले.
लुटमारीनंतर घरी जाण्यास दिले पाच हजार
ज्या इसमाने त्यांना बोलविले होते त्याने लुटमार करणारे टोळीचे सदस्य असताना अनोळखी असल्याचा बनाव केला आणि लुटमार झालेल्या पीडितांना तुम्ही येथून निघून जा, नाहीतर पोलीस तुम्हालाच पकडतील, असा आव आणला. मदत म्हणून या पीडिताना पाच हजार देऊन या भागातून चालले जा, असे सांगितले व त्याने स्वत: पोबारा केला.
आपण गंडविले गेलो, हे लक्षात येताच मुंबईतील हे पाचही जण सायंकाळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आले . वरिष्ठ पातळीवरून त्यांनी संपर्क साधल्याने त्यांची दाद पुकार घेतली गेली. एक पोलीस कॉन्स्टेबल घेऊन त्यांना मधपुरी गावात दुपारी एक वाजता नेण्यात आले. मात्र गावात त्यांना कोणीही मिळून आले नाही. यानंतर त्यांना फिर्याद देण्याकामी कुºहा दूरक्षेत्र पोलीस चौकीत नेण्यात आले आहे.
राज्यासह परराज्यातील धनिकांना विश्वास संपादन करून जडीबुटी, नागमणी, दुतोंडी साप, केमिकल राईस, कास्याचे भांडे यासह अन्य दुर्मीळ वस्तू देण्याच्या बहाण्याने या टोळ्या खरेदीदारांना येथे बोलवतात आणि त्यांची लुटमार करतात.
हा प्रकार इतका वाढला आहे की, लुटमार होताना सर्वसामान्य नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले तरी कानाडोळा करतात. पार्टी लुटली जात आहे, असे सांगतात. या टोळ्यांना पोलिसांचे अभय असल्याचे ते उघडपणे लुटमार करतात, असा सूर आवळला जात आहे.

Web Title: Chieftains robbed with herbs in Madhapuri forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.