लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लस न घेताच प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचा प्रकार जळगाव शहरात समोर आला आहे. जळगाव येथील अशोक लोटन पाटील (रा. रामेश्वर कॉलनी) आणि त्यांच्या पत्नी निर्मला अशोक पाटील यांनी लस घेतलेली नाही. तरीही त्यांचे लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाले असल्याचा दावा त्यांचा मुलगा योगेश पाटील याने केला आहे.
योगेश पाटील यांच्या कुटुंबात सहाजण आहेत. त्यांनी लहान भाऊ गोपाल यांच्या मोबाईल क्रमांकावर आई-वडील, भाऊ आणि वहिनी यांची नोंदणी केली होती. तसेच योगेश आणि त्यांच्या पत्नी मनुबाई यांनी स्वतंत्र नोंदणी केली होती. त्यांपैकी योगेश त्यांच्या पत्नी, भाऊ आणि वहिनी यांनी १८ सप्टेंबर रोजी जी. एम. फाऊंडेशन येथे जाऊन लस घेतली. मात्र त्यांपैकी आई-वडील, भाऊ आणि वहिनी यांचे लस घेतल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यांच्या आईवडिलांनी लसच घेतली नव्हती. तसेच योगेश आणि त्यांच्या पत्नी मनुबाई यांचे लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळालेले नसल्याचे योगेश यांनी सांगितले.