Centennial Opening of Golden Festival 'Giran Dam' | सुवर्ण महोत्सवी ‘गिरणा धरणा’ची शतकी सलामी, ११ वषार्नंतर ओव्हरफ्लो
सुवर्ण महोत्सवी ‘गिरणा धरणा’ची शतकी सलामी, ११ वषार्नंतर ओव्हरफ्लो

जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि. जळगाव : १९६९ मध्ये लोकार्पण झालेल्या गिरणा धरणाचे यंदाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष. ५० वर्षाच्या कटू - गोड आठवणी गाठीशी बांधतांनाच धरणाने आभाळमाया कवेत घेत यंदा ‘शतकी’ सलामीही दिली आहे. सोमवारी रात्री ते तब्बल ११ वषार्नंतर पूर्ण भरले असून मंगळवारी सकाळी नऊ वाजता धरणातून १५०० क्युसेस पाणी नदीत सोडण्यात आले. निम्म्याने जिल्ह्याची तहान भागविणा-या गिरणा धरणाच्या सुवर्ण महोत्सवी कृतज्ञतेचा लोकप्रतिनिधींसह प्रशासनालाही विसर पडल्याची वेदना समाजमनाच्या पटलावर तीव्रपणे उमटली आहे. आता ओव्हरफ्लो झाल्यानंतर तरी त्याच्या जलपूजनाचा सोहळा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
‘गिरणा धरण’ हे उत्तर महाराष्ट्रातील महाकाय जलप्रकल्पांपैकी एक. नऊ सप्टेंबर २०१९ रोजी गिरणा धरणाने ५० वर्ष पूर्ण करुन अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरु केली आहे. जळपास जळगाव जिल्ह्याच्या पाऊण भागाची तहान हे धरण भागवते. धरणामुळे गिरणा खो-याला हिरवे कवचही लाभले आहे.
१९६९ मध्ये पहिल्यांदाच गिरणा धरणात पाणीसाठा साठविण्यात यश आले. याच वर्षी धरणाचे लोकार्पणही झाले. गिरणा धरणाला पहिली प्रशासकीय मान्यता १९५५ मध्ये मिळाली. भूमिपुजनाचा कुदळही मारला गेला. सलग १४ वर्ष काम चालल्यानंतर अवघ्या १३ कोटी रुपयात धरण पूर्णत्वास गेले. ९ सप्टेंबर १९६९ रोजी धरणात अधिकृत पाणीसाठा झाल्याचे गिरणा पाटबंधारे विभागामार्फत सांगण्यात येते. यावर्षी नाशिक परिसरात दमदार पाऊस झाल्याने ते १०० टक्के भरले.
चाळीसगाव शहराच्या पश्चिमेला ४० किमी अंतरावर गिरणा धरण असून नांदगाव तालुक्यातील 'पांझन' गाव हे त्याचे निश्चित स्थळ आहे. गिरणा प्रकल्प नाशिक जिल्ह्यात असला तरी त्याचा सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होतो.
महाकाय साठवण क्षमता
गिरणा धरणाची एकुण पाणी साठवण क्षमता २१ हजार ५००दलघफू असून मृत साठा तीन हजार दलघफू आहे. एक हजार ४०० फूट दगडी तर एक हजार ७६० मातीचे बांधकाम आहे. धरणाची नदी पातळीपासूनची उंची १३३ इंच तर समुद्र सपाटीपासून १३१८ इंच आहे. १८हजार ५०० दलघफू उपयुक्त तर ३०० दलघफू मृतसाठा निर्धारित केला आहे. १३ हजार ५५० एकर बुडीत क्षेत्रात क्षेत्रात धरणाचा विस्तार व्यापला असून एक लाख ४१ हजार ३६४ एकर सिंचन क्षेत्राला धरणाने हिरवा साज दिलायं. कालव्यामुळे दोन लाख ६३ हजार ३७७ एकर क्षेत्र ओलिताखाली येते.
गिरणा धरणापासून निघालेला पांझण डावा कालवा ५३ किमीचा तर जामदा उजवा कालवा २० किमी. याबरोबरच डावा जामदा कालवा ४० तर निम्न गिरणा काठ ६० किमी लांबीचा आहे. या कालव्यांमुळेच गिरणामाईचे खोरे सुपीक झाले आहे. अर्थात कालव्यांमधून होणारी गळती, पाटचा-यांची दुरुस्ती हा ऐरणीवरचा प्रश्न आहे.
१२७ पाणीपुरवठा योजनांचा जीवंत स्त्रोत
मालेगाव शहर, चाळीसगाव शहर यासह नांदगाव, ५६ खेडीअशा १२७ पाणी पुरवठा योजनांसाठी गिरणा धरण हा एकमेव जीवंत पाणीस्त्रोत आहे. याच योजनांव्दारे जळगाव जिल्ह्याच्या पाऊण भागाची तहान भागते. बिगर सिंचनासाठी धरणाचे पाणी दहीगाव बंधा-यापर्यत प्रवास करते.
५० वर्षात आठ वेळा गाठली शंभरी
गिरणा धरणाने गेल्या ५० वर्षात आठ वेळा शंभरी गाठली आहे. १९७३, १९७६, १९८०, १९९४ या अंतराने चार वेळा तर २००४ ते २००५, २००६, २००७ असे सलग चार वर्ष...असे एकुण आठ वेळा गिरणा धरणाने शतकी सलामी दिली आहे. आठ ते दहा वेळा ते ५० टक्क्यांहून अधिक तर १० वेळा ९० टक्के साठवण क्षमता ओंलाडली आहे. पुनंद, हरणबारी, केळझर, चणकापुर आदी मध्यम जलप्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणात पाण्याची आवक होते.
लोकप्रतिनिधींना पडला विसर
एकीकडे विधानसभा निवडणुकीचे डफ वाजू लागले असतांनाच चाळीसगाव तालुक्यात इच्छुकांचे जोरदार शक्तिपदर्शन सुरु झाले. सर्वच 'सिंचन क्रांति' करण्याच्या आणाभाका घेत असले तरी ज्या धरणातून आपल्यासह मततदारांचीही तहान भागते. त्या 'गिरणा' धरणाच्या सुवर्ण महोत्सव (वाढदिवस) विसरच लोकप्रतनिधींसह प्रशासनालाही पडल्याचे स्पष्ट झाले आहे. कृतज्ञता म्हणून तरी धरणाचा सुवर्ण महोत्सव साजरा होणे आवश्यक असल्याचा पर्यावरणप्रेमींचा सूर आहे. कदाचित धरण नांदगाव तालुक्यात असल्याचे कारण पुढे करुनही जबाबदारी झटकली जाईल. अर्थात हा कृतघ्नपणा ठरु शकतो. गिरणा धरणाचा सर्वाधिक फायदा जळगावला जिल्ह्याला होतो. चाळीसगाव पासून ते अवघ्या ४० किमी आहे. संपूर्ण तालुक्याच्या घश्याची कोरडही धरणातूनच ओली होते. गिरणामाईच्या मायेने शेती - शिवाराला हिरवेगार कोंदण लाभले असल्याने चाळीसगाववासियांवर गिरणा धरणाची आभाळमाया जास्त आहे. त्यामुळे कृतज्ञतेची पहिली फुले चाळीसगावकरांची असावीत. असा सूर आहे.

Web Title: Centennial Opening of Golden Festival 'Giran Dam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.