प्राण्यांबद्दल कृतज्ञतेचा उत्सव बैल पोळा सण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:20 IST2021-09-06T04:20:42+5:302021-09-06T04:20:42+5:30

प्रसाद धर्माधिकारी नशिराबाद : कृषिप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झालाय. तरीही बळिराजाच्या ...

Celebration of gratitude for animals Bull Hive Festival | प्राण्यांबद्दल कृतज्ञतेचा उत्सव बैल पोळा सण

प्राण्यांबद्दल कृतज्ञतेचा उत्सव बैल पोळा सण

प्रसाद धर्माधिकारी

नशिराबाद : कृषिप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झालाय. तरीही बळिराजाच्या जीवनात त्यांचे स्थान कायम आहे. शेतकऱ्यांच्या जोडीनं शेतात राबणाऱ्या या सच्चा मित्राचं कौतुक व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा सण साजरा केला जातो. पोळ्याचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात. त्यांना न्हाऊ खाऊ घालून त्यांची रंगरंगोटी केली जाते. पुरणपोळीसारखा गोडधोड जेवणाचा नैवेद्य त्यांना दिला जातो. त्यानंतर वाजत-गाजत बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात येते.

प्राण्यांबद्दल असलेल्या कृतज्ञ भावनांचा उत्सव म्हणजे बैलपोळा. पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकऱ्याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही, तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांना अंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्यांच्या अंगावर झूल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा, तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तऱ्हेने सजविण्यात येते.

शेतकऱ्याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळी काढून त्या पाहुण्याची वाट पाहत असतात, तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजत गाजत जातात व त्याला ''अतिथी देवोभवो''प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांचे विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या रोजी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतकऱ्याला औक्षण करून त्याला नारळ दिले जातात, तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते.

महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांच्या शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकऱ्याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल, त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकऱ्याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यानंतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो.

याच पिठोरी अमावास्येच्या दिवशी सुवासिनी व्रत करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. घरातील मुलास अथवा मुलीस पुरणपोळीचे वाण खांद्यावरून मागे नेत ''अतित कोण?'' असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात.

Web Title: Celebration of gratitude for animals Bull Hive Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.