ग्रामीण भागात बस सेवा बंदच, प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:06+5:302021-07-28T04:17:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भडगाव : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून ग्रामीण भागातील बससेवा बंदच आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत ...

ग्रामीण भागात बस सेवा बंदच, प्रवाशांचे हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
भडगाव :
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून ग्रामीण भागातील बससेवा बंदच आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. पाचोरा आगारातून ग्रामीणसाठी सुटणाऱ्या १४८ बसेसमध्ये एकही बस भडगाव ग्रामीणसाठी नाही. भडगाव बसस्थानक नावालाच असल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुमारे दीड वर्षापासून भडगाव तालुक्यात ग्रामीण भागात ये-जा करणाऱ्या एस. टी. बस सेवा बंद आहेत. फक्त लांब पल्ल्याच्या बसेस भडगाव बसस्थानकामार्गाने सुरू आहेत. मात्र, तालुक्यात ग्रामीण भागातून प्रवासी, विद्यार्थ्यांनी प्रवास करावा कसा? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. आता शाळाही सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील बस सेवा बंदच असल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे प्रवासासाठी मोठे हाल होत आहेत. तरी एसटी महामंडळाने तत्काळ भडगाव तालुक्यात ग्रामीण भागात गावागावात बंद झालेल्या बसफेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात. प्रवासी व विद्यार्थी यांची प्रवासाची सोय करावी, अशी मागणी तालुक्यातील प्रवाशांसह विद्यार्थी, पालकवर्गातून होत आहे.
भडगाव बसस्थानकातून ये-जा करणाऱ्या बसफेऱ्या पाचोरा आगारातून सुटतात. पाचोरा आगारातून भडगाव मार्गाने सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या एकूण ९६ बसेस आहेत. यात ४८ बसफेऱ्या येणाऱ्या व ४८ बसफेऱ्या या जाणाऱ्या आहेत. भडगाव तालुक्यात ग्रामीण भागात भडगाव बसस्थानकातून स्वतंत्र मुक्कामी वा इतर एकही बस फेरी सुरू नाही.
भडगाव बसस्थानक मार्गाने ग्रामीण भागात जाणाऱ्या बहाळ, ता. चाळीसगाव येथे २ बस फेऱ्या सुरू आहेत.
ग्रामीण भागात बसेस न सोडण्याचे कारण म्हणजे कोरोना परिस्थिती आहे. तब्बल दीड वर्षापासून भडगाव तालुक्यात ग्रामीण भागात एकही स्वतंत्र बसफेरी सुरू नाही. यात पारोळा आगारातून ये - जा करणाऱ्या बसेस टिटवी, महिंदळे, पळासखेडे मार्गाने सुरू आहेत. मात्र, पाचोरा आगारातून पाचोरा तालुक्यात ग्रामीण भागात काही बसफेऱ्या सुरू आहेत. मग भडगाव तालुक्यातील ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू का झालेल्या नाहीत? की तालुक्याला कोणी वाली नाही? असा संतप्त प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. भडगावचे बसस्थानक नावाला आहे. पाचोरा आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या एकूण २२ बस फेऱ्या सुरू आहेत. इतर पाचोरा ग्रामीणसह बसफेऱ्या सुरू आहेत.
पाचोरा आगारातून बसेस रोज १८ हजार कि. मी. अंतर कापतात. पाचोरा आगाराचे दररोजचे उत्पन्न साडेचार ते पावणेपाच लाखांचे आहे.
पाचोरा आगारातून लांब पल्ल्याच्या एकूण २२ बसफेऱ्या सुरू असून, ग्रामीण भागात एकूण १४८ बसफेऱ्या सुरू आहेत. अशा एकूण १७० बसफेऱ्या सुरू आहेत. पाचोरा आगाराचे दररोजचे उत्पन्न साडेचार ते पावणेपाच लाखांचे आहे. भडगाव तालुक्यात ग्रामीण भागात टप्प्याटप्प्याने लवकरच बस फेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात येतील.
-सागर फिरके, सहाय्यक वाहतूक अधिकारी, पाचोरा आगार