तांबापुरात घरफोडी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 22:05 IST2019-11-27T22:04:46+5:302019-11-27T22:05:12+5:30
सराईत गुन्हेगार : भांड्यावर नावामुळे झाला निष्पन्न

तांबापुरात घरफोडी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
जळगाव : तांबापुरातील बिसमिल्ला चौकात राहणाºया जमीलाबी शेख इस्माईल (५४) यांच्या बंद घराचे कुलुप तोडून ४० हजार ४०० रुपयांचा ऐवज लांबविणारा शेख फिरोज शेख इकबाल शेख (२२, रा.तांबापुरा) याला एमआयडीसी पोलिसांनी २४ तासातच अटक केली आहे. फिरोज हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्याविरुध्द गुन्हे दाखल आहेत.
जमीलाबी उपचारासाठी १० नोव्हेंबर रोजीच शिर्डी येथे गेल्या होत्या.त्यामुळे घराला कुलुप होते.२४ रोजी दुपारी ४ वाजता घराचे कुलुप तुटलेले दिसले. घरातील २५ हजार ४०० रुपये रोख, २ सोन्याच्या अंगठ्या, ९ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत व पितळी भांडे असा ४० हजार ४०० रुपयांचा ऐवज लांबविल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपूत व विजय नेरकर यांच्या पथकाने फिरोज याला पेट्रोलिंग करतानाच पकडले. त्याच्याजवळ चोरीतील भांडे आढळून आले असून त्यावर जमीलाबी यांच्या मुलाचे नाव होते.त्याने गुन्ह्याचीही कबुली दिली आहे. दरम्यान, त्याच्याविरुध्द नशिराबाद व एमआयडीसीलाच गुन्हे दाखल आहेत. तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहेत.