बहिणीच्या भेटीसाठी जाणारा भाऊ अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 14:10 IST2019-08-12T14:09:39+5:302019-08-12T14:10:56+5:30
नशिराबादजवळ अपघात : मृत इसम मोहाडी येथील रहिवासी

बहिणीच्या भेटीसाठी जाणारा भाऊ अपघातात ठार
नशिराबाद/जळगाव : बामणोद, ता.यावल येथे असलेली बहीण व मुलीच्या भेटीसाठी जाणारे नागेश रामदास सोनवणे (४८, रा.मोहाडी, ता. जळगाव) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता महामार्गावर नशिराबादजवळील पाटील नर्सरीजवळ घडली.
मिळालेली माहिती अशी की, नागेश सोनवणे यांची बहीण व मुलगी निशा हे दोन्ही बामणोद येथेच राहतात. या आठवड्यात रक्षाबंधन असल्याने ते बहिण व मुलीच्या भेटीसाठी रविवारी दुपारी दुचाकीने (एम.एच १९ सीएम६७०६) जात असताना दुपारी साडे बारा वाजता नशिराबाद येथे पाटील नर्सरी जवळ भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.त्यात नागेश सोनवणे यांचा मृत्यू झाला.
रघुनाथ रामदास सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी हिराबाई, मुलगा नरेश, मुलगी निशा असा परिवार आहे.
आधारकार्डवरुन पटली ओळख
नशिराबाद पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे ,पोलीस उपनिरीक्षक गणेश हिवरकर, प्रवीण ढाके, गुलाब माळी, लीना लोखंडे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.आधार कार्डावर मृताची ओळख पटली. मोहाडी येथील पोलीस पाटील शरद सोनवणे यांच्याशी पोलीसांनी संपर्क केला. त्यावरून मृताच्या नातलगांशी संपर्क करण्यात आला.