लाच घेणारा स्वच्छता निरीक्षक अखेर अमळनेर पालिकेच्या सेवेतून बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 21:19 IST2017-11-13T21:13:23+5:302017-11-13T21:19:53+5:30
पालिकेच्या सफाई कामगाराकडून पाचशे रुपयांची लाच घेणाºया हैबतीराव पाटील यांना सेवेतून अखेर बडतर्फे करण्यात आले आहे. या प्रकरणी त्यांना या अगोदर निलंबीत करण्यात आले होते.

लाच घेणारा स्वच्छता निरीक्षक अखेर अमळनेर पालिकेच्या सेवेतून बडतर्फ
लोकमत आॅनलाईन
अमळनेर, दि.१३ : लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली शिक्षा झालेले नगर पालिकेचे तत्कालीन स्वच्छता निरीक्षक हैबतराव माधवराव पाटील यांना १३ नोव्हेंबरपासून पालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. २०११ मध्ये हैबतराव पाटील यांना सफाई कामगाराकडून पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. यात पाटील यांना शिक्षा आणि दंडही करण्यात आला होता. पाटील यांनी याविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले होते, मात्र त्यांना न्यायालयाने दिलासा दिला नव्हता. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी पाटील यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश नगर पालिकेला दिला होता. परंतु नगरपालिकेकडून याबाबत टाळाटाळ केली जात होती, असे जाणकारांचे म्हणणे होते. मात्र याबाबत मंत्रालयस्तरावर कार्यवाही सुरूच होती.
मुंबई येथील मंत्रालयातील नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी यांनी १० नोव्हेंबर २०१७ रोजी जिल्हाधिकारी यांच्या ३ जून २०१७ च्या आदेशानुसार स्वच्छता निरीक्षक हैबतराव पाटील यांना बडतर्फ करण्याचे आदेश नगरपालिकेला दिल्याने महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती, व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ७९ (३) व ४ च्या तरतुदी नुसार १३ नोव्हेंबर २०१७ पासून पाटील यांना नगर पालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अशा पद्धतीने लाच लुचपत प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर सेवेतून बडतर्फ झाल्याची अमळनेर नगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील ही पहिलीच घटना आहे.