Both stomachs are gone, what do I do now though? | पोटची दोन्ही पोरं सोडून गेली, मी आता जगून तरी काय करू? - आईने फोडला हंबरडा
पोटची दोन्ही पोरं सोडून गेली, मी आता जगून तरी काय करू? - आईने फोडला हंबरडा


वासेफ पटेल ।

भुसावळ : शहरातील जामनेर रस्त्यावरील दीनदयाल नगर समोरील तिरुपती पेट्रोल पंपावर असलेल्या कारंजाजवळ खेळत असताना पाण्यात उतरलेल्या वीज प्रवाहाचा शॉक लागून ७ रोजी संध्याकाळी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने या मुलांच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला असून मी जगून काय करू, मला जगायचे नाही असा टाहे ती फोडत आहे.
विरोध करूनही मुले गेले होते खेळायला
या मुलांची आई आशा शंकर राखुंडे हिने विरोध करूनही शनिवारी सायंकाळी गणेश (वय ११), दीपक (वय १२) हे खेळायला गेले. पकडापकडी खेळत असताना गणेश हा मधूनमधून कारंजातील पाण्यामध्ये हात टाकत होता व अशातच गणेशचा पाय घसरून तो कारंज्यात पडला. यावेळी शॉक लागल्यानंतर तो थरथर करत असताना मोठा भाऊ दीपकला वाटले की, भावाला अचानक थंडी भरून आली म्हणून तो त्याला आधार देण्यासाठी खाली उतरला, मात्र तो जिवंत वर आलाच नाही.
खटके उडाले म्हणून आले भुसावळात
मुलांची आई आशा शंकर राखुंडे ही धुळे येथे राहत होती, परंतु पती शंकर भगवान राखुंडे हा व्यसनी असल्यामुळे दोघांचे नेहमीच खटके उडायचे. यामुळे आशा राखुंडे ही दोन्ही मुलं आणि मुलीला घेऊन तीन महिन्यांपूर्वी भुसावळ येथे आली होती मात्र नियतीला काही औरच मान्य असल्यामुळे हा प्रसंग घडला.
पिंटू कोठारी धावले मदतीला
नगरसेवक पिंटू कोठारी यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी लागलीच दोन वाहने थांबवून या दोघा भावंडांना रुग्णालयात हलविले, पण त्यांचा मृत्यू झाला होता. कोठारी यांनी या अत्यंत गरीब कुटुंबाला आर्थिक सहकार्यदेखील केले. तर शासनाने देखील या कुटुंबास तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा तगडा बंदोबस्त पेट्रोल पंपावर लावण्यात आला आहे.

बहीण नंदिनी वाचली
दोन्ही भाऊ विजेच्या धक्क्याने दगावल्याची माहिती मिळताच त्यांना वाचण्यासाठी धावात सुटलेली बहीण नंदिनी (वय १३) ही पण त्यांच्याजवळ जाणार तोवर उपस्थित जनसमुदायाने तिला पकडल्यामुळे नंदनीचा जीव वाचला.
वाहनाखाली झोकण्याचा मुलांच्या आईचा प्रयत्न
हे कुुटुंब जामनेररोड वरील एका झोपड्यात राहत होते. २४ तास वाहतुकीची या ठिकाणी वर्दळ असते. याठिकाणी ८ रोजी सकाळपासून दुपारपर्यंत अनेक वेळा स्वत:ला वाहनाखाली निराशेपोटी झोकण्याचा प्रयत्न आशाबाईने केला मात्र काही वेळेस आजुबाजुच्यांनी तर काही वेळेस स्वत: वाहनधारकांनीच वाचविले.
भांडी धुऊन व कचरा वेचून ओढायचे संसाराचा गाडा
धुळे येथून भुसावळला आल्यानंतर आशा राखुंडे ही पोटाची खळगी भरण्यासाठी सिंधी कॉलनीमध्ये लोकांचे भांडी घासायची तर मुलंही रस्त्यावरील कचरा उचलून संसाराचे गाडा ओढण्यासाठी आईला मदत करत होते.

Web Title: Both stomachs are gone, what do I do now though?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.