....तर भाजपा उमेदवाराचा प्रचार करणार नाही - चाळीसगावात शिवसैनिकांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:41 IST2019-03-15T00:41:14+5:302019-03-15T00:41:24+5:30
पत्रकार परिषद

....तर भाजपा उमेदवाराचा प्रचार करणार नाही - चाळीसगावात शिवसैनिकांची भूमिका
चाळीसगाव : भाजपा आमचा फक्त निवडणुकीसाठी वापर करुन घेते. युतीचा धर्मदेखील निवडणुकीसाठीच पाळला जातो. त्यामुळे जळगाव लोकसभेची जागा शिवसेनाला द्यावी, अशी आमची मागणी आहे. तरीही जागा भाजपाला सोडल्यास आम्ही प्रचारच करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण व बाजार समितीचे उपसभापती महेंद्र पाटील यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत मांडली.
शिवसेनेकडे तुल्यबळ उमेदवार असून वन बुथ टेन युथ हे संघटनही मजबूत आहे. माजी आमदार आर.ओ.पाटील यांनी गेल्या सहा महिन्यांपासून मतदार संघात प्रचारही सुरु केला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जागा शिवसेनेला मिळावी म्हणून मागणीही केली आहे. लवकरच पुन्हा त्यांची भेट घेऊन शिवसैनिकांची रास्त भूमिका त्यांच्याकडे मांडणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
दुपारी चार वाजता घेतलेल्या पत्रपरिषदेला महेंद्र पाटील, रमेश चव्हाण यांच्यासह शहर प्रमुख व नगरसेवक श्यामलाल कुमावत, प्रवक्ते दिलीप घोरपडे, माजी नगरसेवक नंदकिशोर बाविस्कर, नीलेश गायके आदी उपस्थित होते.