वाढदिवसच ठरला आयुष्याचा शेवटचा दिवस; तब्बल २१ तासानंतर सापडले मृतदेह, बऱ्हाणपुरच्या धबधब्यात बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 18:34 IST2021-09-06T18:32:08+5:302021-09-06T18:34:56+5:30
Accident : जयेश माळी याचा रविवारी वाढदिवस होता, त्याच दिवशी त्याला मृत्यूने कवटाळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वाढदिवसच ठरला आयुष्याचा शेवटचा दिवस; तब्बल २१ तासानंतर सापडले मृतदेह, बऱ्हाणपुरच्या धबधब्यात बुडाले
जळगाव : वाढदिवसाचे औचित्य साधून मध्य प्रदेशातील बर्हाणपूर येथील बसाली धबधब्यावर पर्यटनाला गेलेले जयेश रवींद्र माळी (वय २४, रा.वाघ नगर) व अक्षय उर्फ उज्ज्वल राजेंद्र पाटील (वय २३, रा.खेडी,जळगाव) दोन तरुण रविवारी दुपारी चार वाजता धरणात बुडाले. दोघांचे मृतदेह २१ तासांनी अर्थात दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी १ वाजता धबधब्यात आढळून आले. जयेश माळी याचा रविवारी वाढदिवस होता, त्याच दिवशी त्याला मृत्यूने कवटाळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश याचा वाढदिवस असल्याने त्याच्यासह १६ मित्रांनी बर्हाणपूर येथील बसाली धबधब्यावर जाण्याचे नियोजन केले. त्यानुसार जयेश, उज्ज्वल व त्याचा लहान भाऊ यांच्यासह सर्व मित्र वेगवेगळया वाहनाने रविवारी सकाळी ८ वाजता बर्हाणपूरकडे रवाना झाले. त्याठिकाणी पाण्यात खेळत असतांना जयेशचा पाय घसरुन तो पाण्यात पडला. त्याला वाचवितांना उज्ज्वलही पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाल्याने दोघांच्या शोधार्थ रात्री ११ वाजेपर्यंत शोध मोहिम राबविण्यात आली. मात्र दोघेही सापडले नाही. त्यानंतर दुसर्या दिवशी सोमवारी सकाळपासून शोध मोहिम राबविण्यात आली. दुपारी १२.३० वाजता धबधब्याच्या एका कपारीत अडकलेले दोघांचे मृतदेह मिळून आले. त्यांची ओळख पटविली असता जयेश व उज्ज्वल हे दोघेचे असल्याचे समोर आले.
दोघांचे मृतदेह पाहून कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. दोघांचे मृतदेह बर्हाणपूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले. शवविच्छेदनानंतर ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.