जळगावात १२ लाखाचे सोने घेऊन बंगाली कारागिर पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 16:59 IST2018-02-20T16:57:49+5:302018-02-20T16:59:32+5:30
दागिने घडविण्यासाठी तीन सराफांनी कारागिराकडे दिलेले १२ लाख रुपये किमतीचे ७०० ग्रॅम सोने घेऊन हा कारागिर पसार झाला आहे. या घटनेला एक आठवडा पुर्ण झाला आहे.

जळगावात १२ लाखाचे सोने घेऊन बंगाली कारागिर पसार
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. २० - दागिने घडविण्यासाठी तीन सराफांनी कारागिराकडे दिलेले १२ लाख रुपये किमतीचे ७०० ग्रॅम सोने घेऊन हा कारागिर पसार झाला आहे. या घटनेला एक आठवडा पुर्ण झाला आहे. संबंधित व्यापाºयाने पोलिसांकडे तोंडी तक्रार केली असून लेखी तक्रार देण्यास नकार दिल्याने गुन्हा दाखल होवू शकलेला नाही. दरम्यान, बंगाली कारागिर सोने घेऊन गेल्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे.
सराफ बाजारातील एका सराफाने या बंगाली कारागिराकडे दागिने घडविण्यासाठी ७०० ग्रॅम सोने दिले होते. मुदतीत सोने आणून न दिल्याने सराफाने त्याची चौकशी केली असता तो कोलकात्ता येथे दागिने घेऊन गेल्याचे उघड झाले. अंतर्गत वादातून हा कारागिर सोने घेऊन गेला आहे. मालकाने त्याच्याशी संपर्क साधला असता मी अजून तिकडे येणार नाही असे सांगून कारागिर टाळाटाळ करीत आहे. दरम्यान, सोने परत मिळत नसल्याचे पाहून सराफाने शनी पेठ पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक प्रवीण वाडिले यांच्याकडे तक्रार केली. वाडिले यांनी रितसर फिर्याद देण्यास सांगितले असता सराफाने त्यास नकार दिला.