मनपाकडून गाळेधारकांचे बँक खाते सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:12 IST2021-07-09T04:12:00+5:302021-07-09T04:12:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे अनेक वर्षांपासून भाड्याची रक्कम थकली आहे. मनपाकडून वेळोवेळी नोटीस ...

मनपाकडून गाळेधारकांचे बँक खाते सील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे अनेक वर्षांपासून भाड्याची रक्कम थकली आहे. मनपाकडून वेळोवेळी नोटीस देऊनदेखील गाळेधारक थकीत भाडे भरायला तयार नाहीत. याबाबत न्यायालयाने आदेश दिल्यावरही गाळेधारकांनी थकीत भाडे भरलेले नसल्याने, आता मनपा प्रशासन ‘ॲक्टिव्ह मोड’मध्ये आले आहे. मनपा प्रशासनाने बुधवारी शहरातील चार - पाच मार्केटमधील ५०हून अधिक गाळेधारकांचे बँक खाते मनपाकडून सील करण्यात आले आहे.
महापालिका प्रशासनाने मे महिन्यात मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत नवीन धोरण निश्चित केले होते. या धोरणानुसार अनेक वर्षांपासून असलेले थकीत भाडे भरणारे गाळेधारकच नूतनीकरणासाठी पात्र ठरू शकतील, अन्य गाळेधारकांचे गाळे ताब्यात घेऊन ते गाळे लिलाव करण्याचा निर्णय मनपाने घेतला. तसेच गाळेधारकांना नूतनीकरणासाठी आपली पात्रता सिध्द करण्याआधी थकीत भाडे भरण्याबाबतदेखील मनपा प्रशासनाकडून गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आल्या. मात्र, तरीही गाळेधारकांनी भाड्याची थकीत रक्कम न भरल्यामुळे आता मनपाने थेट गाळेधारकांचेच बँक खाते सील केले आहे.
टप्प्याटप्प्याने केले जातील बँक खाते सील
मनपा प्रशासनाकडून मुदत संपलेल्या मार्केटमधील सर्व गाळेधारकांचे बँक खाते टप्प्याटप्प्याने सील केले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या मार्केटमधील बडे थकबाकीदार मनपाच्या रडारवर असून, दुसऱ्या टप्प्यात इतर मार्केटमधील गाळेधारक रडारवर राहणार आहेत. मनपाने शहरातील काही बँकांना पत्र पाठवून उरलेल्या गाळेधारकांचीही बँक खाती सील करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
कारवाईपेक्षा थकबाकी वसूल करण्यावर मनपाचा भर
न्यायालयाने मनपा प्रशासनाला गाळेधारकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी मनपा प्रशासन गाळेधारकांवर कारवाईपेक्षा थकीत रक्कम कशी वसूल होणार यावर भर देत आहे. कारवाई करून, गाळे सील केले तर मनपाला वसुलीसाठी गाळेधारकांच्याच मागे लागावे लागणार आहे. त्यापेक्षा गाळेधारकांकडून भाड्याची थकीत रक्कम मिळाल्यास मनपाची आर्थिक परिस्थिती सुधारून मनपाचा आर्थिक प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने आता गाळेधारकांचे बँक खाते सील करून, गाळेधारकांचे ‘नाक दाबून तोंड उघडण्या’ची खेळी केली आहे.
गाळेधारकांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही
मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांमध्येदेखील फूट पडली असून, व्यावसायीक व अव्यावसायीक मार्केटमधील गाळेधारक वेगवेगळे झाले आहेत. त्यात मनपाने आता ज्या गाळेधारकांचे बँक खाते सील केले आहे. त्यामध्ये व्यावसायीक व अव्यावसायीक मार्केटमधील गाळेधारकांचाही समावेश आहे. त्यामुळे आता गाळेधारकांच्या आंदोलनाची दिशा काय राहील ? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.