करंज येथील शेतकऱ्याची केळी इराणला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:27+5:302021-09-04T04:21:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे केळीला बोर्ड भावानुसार भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच, ...

करंज येथील शेतकऱ्याची केळी इराणला रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एकीकडे केळीला बोर्ड भावानुसार भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच, दुसरीकडे या खडतर परिस्थितीवर मात करून जळगाव तालुक्यातील करंज येथील प्रदीप शांताराम पाटील या शेतकऱ्याने केळीचे पीक घेऊन थेट अरब देशांमधील इराणला आपली केळी रवाना केली आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना विदेशामध्ये निर्यातीद्वारे नवा मार्ग सापडला आहे.
जळगाव तालुक्यातील करंज येथील प्रदीप शांताराम पाटील या शेतकऱ्याच्या शेतातील केळी शुक्रवारी इराण येथे रवाना झाली. नैसर्गिक आपत्तीने शेतकरी त्रस्त झाला असताना आता काही प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी निर्यातीचा पर्याय उपलब्ध झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी करंज येथे जाऊन प्रदीप पाटील यांचे कौतुक केले. त्यांचा आदर्श घेऊन परिसरातील शेतकऱ्यांनी निर्यातक्षम केळीची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. गजानन ॲग्रो, पोलन ॲग्रो मिनरल व धर्ती कृषी संवर्धन यांच्या केळी विदेशात पाठविण्यात येणार आहेत. याप्रसंगी सौरभ चौगुले, योगेश जिंदमवर, संग्राम कुरणे, तसेच गावातील प्रतिष्ठित शेतकरी रामदास पाटील, हिलाल पाटील, अनिल सपकाळे, ज्ञानेश्वर पाटील, संजय सपकाळे, सुनील सपकाळे, शरद पाटील, सुरेश सपकाळे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात जळगावच्या केळीला मागणी
जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध असून, काही वर्षांपर्यंत जिल्ह्यातील केळी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात व उत्तर प्रदेश अशा राज्यांमध्ये निर्यात केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये जळगावच्या केळीला नवी ओळख मिळाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारामध्येदेखील मोठी मागणी वाढली आहे. विशेष करून अरब देशांमध्ये केळीची मागणी वाढली आहे. सौदी अरब, इराण, अफगाणिस्तान, कुवेत, कतार या देशांमध्ये केळीला मोठी मागणी आहे. दरम्यान, भारतातील ईशान्येकडील राज्य जम्मू-काश्मीर हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येदेखील जिल्ह्यातील केळी मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. देशांतर्गत बाजार व आंतरराष्ट्रीय बाजारात केळीला मागणी असतानादेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोर्ड भावानुसार भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोर्ड भावानुसार भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.