आईच्या कुशीतून लेकीला पळवलं; बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 14:38 IST2025-04-18T14:38:33+5:302025-04-18T14:38:55+5:30
आईला जाग येताच तिने आरडाओरडा केला; पण रात्रीची वेळ असल्याने बिबट्या अंधारात पसार झाला.

आईच्या कुशीतून लेकीला पळवलं; बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
जळगाव : गेल्या महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात किनगाव परिसरात बाळ ठार झाले असताना आता दोन वर्षाच्या बालिकेला बिबट्याने ठार केल्याची घटना यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात बुधवारी रात्री घडली.
यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील शेतशिवारात बुधवारी मध्यरात्री बिबट्याने रत्ना या दोन वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेले. ती आपली आई जिजाबाई रूपनर हिच्यासह झोपलेली होती. जिजाबाईला जाग येताच तिने आरडाओरडा केला; पण रात्रीची वेळ असल्याने बिबट्या लागलीच पसार झाला. थोड्या अंतरावर तिचा मृतदेहच आढळून आला. या दुर्घटनेची माहिती मिळताच रात्री एकच्या सुमारास वनअधिकारी विपुल पाटील, पश्चिम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे, यावलचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर व त्यांचे सहकारीही रात्रीच येथे दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी वन अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
बिबट्याला पाठवणार नागपूरला
घटनेनंतर घटनास्थळी चार पिंजरे लावण्यात आले. यापैकी डॉ. यश सागर व वनपाल गणेश गवळी यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात बसविण्यात आले. यानंतर रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास ज्या भागात चिमुरडीला ठार मारले होते, त्या परिसरात बिबट्या पोहचला. गवळी यांनी बिबट्यावर बेशुद्धीचे इंजेक्शन शूट केले. नंतर तो काही मिनिटे तिथेच घुटमळला आणि बेशुद्ध झाला. यानंतर लागलीच बिबट्याला पिंजऱ्यात नेण्यात आले. या बिबट्याला शुक्रवारी नागपूर येथे पाठवण्यात येईल.