Automatic Insect Trap : आता किटकांसाठीही लावता येईल सापळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 16:30 IST2018-09-04T16:28:46+5:302018-09-04T16:30:20+5:30
Automatic Insect Trap: एरंडोल येथे कृषी विभागात कार्यरत असलेले व धुळ्यातील रहिवासी अमोल पाटील यांनी ‘अॅटोमॅटीक सोलर लाईट स्ट्रीकी ट्रॅप’ तयार केले आहे. या इकोफ्रेंडली यंत्रामुळे बोंडअळी, कीड हे आपोआप सापळ्यात अडकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

Automatic Insect Trap : आता किटकांसाठीही लावता येईल सापळा!
- अतुल जोशी
धुळे - पावसाच्या अनियमिततेमुळे शेती करणे अवघड झाले आहे. त्यातच पिकांवर पडणाऱ्या बोंडअळीसह विविध प्रकारच्या कीडीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येवू लागली आहे. फवारणी करूनही या किडीचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही. त्यामुळे बळीराजा त्रस्त झालेला आहे. मात्र आता यावर मार्ग उपलब्ध झालेला आहे. एरंडोल येथे कृषी विभागात कार्यरत असलेले व धुळ्यातील रहिवासी अमोल पाटील यांनी ‘अॅटोमॅटीक सोलर लाईट स्ट्रीकी ट्रॅप’ तयार केले आहे. या इकोफ्रेंडली यंत्रामुळे बोंडअळी, कीड हे आपोआप सापळ्यात अडकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.
आजच्या काळात शेतातील महत्वाचा भाग म्हणजे कीड व्यवस्थापन होय. गेल्या दोन-तीन वर्षांपासून कपाशीवर बोंडअळी तर इतर पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. बोंडअळी, कीडमुळे शेतीचे उत्पन्न निम्यावर आले आहे.
अमोल पाटील यांना सुरवातीपासूनच इलेक्ट्रॉनिक्स विषयाची आवड होती. कृषी विभागात काम करतांना बोंडअळी, कीड यावर काय उपाय करता येईल, यावर त्यांचे प्रयोग सुरू होते. त्यातूनच ‘अॅटोमॅटीक सोलर लाईट स्ट्रीकी ट्रॅप’ हे यंत्र तयार केले. या यंत्रात पिवळ्या रंगाचे चिकी शीट, निळ्या रंगाचा लाईट व सोलर सर्किट लावलेले आहे. एकरी दोन युनिट लागतात. एका युनिटला तीन पिवळे शीट लावता येतात. हे यंत्र तयार करण्यासाठी त्यांना सहा महिन्याचा कालावधी लागला.
हे यंत्र फक्त सूर्यप्रकाशावर काम करते. त्यामुळे विजेची आणि खर्चाची मोठ्या प्रमाणात बचत होते. हा सोलर लाईट स्ट्रीकी ट्रॅप प्रकाश सापळा, चिकट सापळा, कामगंध सापळा यांचे संयुक्तरित्या प्रभावीपणे काम करतो. दिवसा शेतात उडणारे, हानीकारक कीटक (उदा. मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडी, सर्व प्रकारच्या आळींचे पतंग) हे सापळ्यात चिकटतात.
या यंत्रातील दिवा स्वयंचलित असल्याने रात्री प्रकाशित होतो. त्यामुळे अंधारात संचार करणारे सर्व प्रकारचे किटकांचे पतंग दिव्याजवळ आकर्षित होतात व सापळ्याला चिकटतात. त्यामुळे या यंत्राचा शेतक-यांना फायदाच होणार आहे. या यंत्राच्या पेटंटसाठी नोंदणीही केल्याची माहिती अमोल पाटील यांनी दिली.
यंत्राचे फायदे असे-
यंत्र सोलर, सौरउर्जेवर असल्याने शेतात कुठेही लावता येते. डोंगर उतारावर, पहाडी क्षेत्रातही लावता येते. स्वयंचलित असल्याने, चालू-बंद करण्याची गरज नाही. वर्षभर दिवस-रात्र काम करते, मास ट्रॅपिंगमुळे प्रभावशी ल कीडरोधक उपाय आहे.
या स्वयंचलित यंत्रामुळे किटकनाशकांवर होणारा खर्च कमी होणार आहे. हे यंत्र इकोफ्रेंडली असून,ते शेतकºयांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
- अमोल पाटील,
यंत्र विकसक,धुळे