निवडणूकजवळ आल्यावरच पालकमंत्र्यांना बहिणाबाई स्मारकाची आठवण; गुलाबराव देवकर यांचा आरोप
By Ajay.patil | Updated: August 22, 2023 20:30 IST2023-08-22T20:29:51+5:302023-08-22T20:30:18+5:30
आसोदा येथे प्रस्तावित असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी १२ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली.

निवडणूकजवळ आल्यावरच पालकमंत्र्यांना बहिणाबाई स्मारकाची आठवण; गुलाबराव देवकर यांचा आरोप
जळगाव : दरवर्षी बहिणाबाईंची जयंती आली किंवा निवडणुका जवळ आल्या की बहिणाबाई स्मारकाची आठवण येत असते. मात्र, १० वर्षात मंत्री असतानाही गुलाबराव पाटील यांना स्मारकाचे काम पूर्ण करता आले नसल्याची टीका माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केली आहे.
आसोदा येथे प्रस्तावित असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी १२ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. या घोषणेनंतर मंगळवारी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषद घेत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील तसेच स्मारक समितीचे बंडू भोळे उपस्थित होते.
स्मारकाचे १०० टक्के श्रेय माझे
गुलाबराव देवकर म्हणाले की, मी पालकमंत्री असतांना पाठपुरावा करुन बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी जागा मिळवली. तसेच त्यासाठी नियोजन समितीमधून ३ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन स्मारकाच्या कामाला सुरुवात केली. इमारतीचे काम पूर्ण झाले. मात्र, गेल्या दहा वर्षात बहिणाबाई स्मारकासह धरणगाव येथील बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाचे काम मंत्री असून देखील गुलाबराव पाटील यांना पूर्ण करता आले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्तेतील मंत्री व आमदार निवडणुकीच्या तोंडावर निधीची घोषणा करुन श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांनी काय पाठपुरावा केला याचे पुरावे द्यावे असे आव्हानही देवकरांनी दिले.
गिरीश महाजनांचे अभिनंदन पण...
देवकर म्हणाले की, स्मारकाला १२ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केल्याबद्दल पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांचे आम्ही अभिनंदन करतो. मात्र, त्यासाठी काहीच प्रस्ताव नसल्याचे सांगत या निधीतून काय करणार? हे स्पष्ट करावे. तसेच वर्षभराच्या आत बहिणाबाई तसेच बालकवी यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली. फेब्रुवारी महिन्यात जळगाव जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. तोपर्यंत स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आल्यास जिल्ह्यासाठी ही बाब अभिमानास्पद ठरेल, असेही देवकर शेवटी म्हणाले.