संतांच्या भेटीतून प्रगटले विश्वाचे आर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST2021-07-31T04:18:21+5:302021-07-31T04:18:21+5:30
अर्पण लोढा जामनेर : विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशलें । अशीच अवस्था दोन संतांच्या भेटीतून प्रगटली आणि ...

संतांच्या भेटीतून प्रगटले विश्वाचे आर्त
अर्पण लोढा
जामनेर : विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशलें । अशीच अवस्था दोन संतांच्या भेटीतून प्रगटली आणि अवघेचि जालें देहब्रह्म... असा अनुभव फर्दापूर परिसर आणि जामनेर तालुक्यातील बंजारा समाजाला आला. जैन समाजातर्फे आचार्य कल्पवृक्षनंदी महाराज तर बंजारा समाजाच्यावतीने श्याम चैतन्य महाराज यांच्या भेटीतून हे आर्त प्रगटले आणि पूर्वापार चालत आलेली प्राणी बळींची प्रथा बंद करण्याचा निर्णय बंजारा समाजाने घेत आदर्श निर्माण केला.
फर्दापूर परिसरातील फर्दापूर तांडा, जंगला तांडा, वरखेड़ी तांडा, निंबायती, लिहा तांडा व आजूबाजूच्या परिसरातील बंजारा समाजातील लोक नवस फेडण्यासाठी प्राण्यांचा बळी देत होते. गेल्या अनेक वर्षापासून ही प्रथा सुरू होती. फर्दापूर येथील दिगंबर जैन कल्पवृक्ष कलशाकार तीर्थक्षेत्र असलेल्या मंदिरासमोर प्राणी बळीचा हा प्रकार घडत होता.
दिगंबर जैन कल्पवृक्ष कलशाकार तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी राज्य तसेच परराज्यातून भाविक येत असल्याने मोठीच चिंतेची बाब झाली होती.
जैन संत प. पू. आचार्य श्री १०८ कल्पवृक्षनंदीजी महाराज यांनी पुढाकार घेत बंजारा समाजाचे श्याम चैतन्य महाराज यांना हा प्रकार सांगितला. यावर काही दिवसांपूर्वी फर्दापूर येथे दोन्ही संतांची भेट झाली.
यानंतर शाम चैतन्य महाराज यांनी या परिसरातील बंजारा बांधवांची बैठक घेतली आणि या तीर्थस्थानासमोर कुठल्याही प्रकारे प्राण्यांचा बळी दिला जाऊ नये, असे आवाहन केले. या आवाहनाला समाजातील लोकांनी होकार दिला. त्यांची अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे या तीर्थस्थानासमोरील हा प्रकार आता पूर्णत: बंद झाला आहे.
यावेळी बंजारा समाजाचे तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव चव्हाण, मोरसिंग राठोड, एन. टी. चव्हाण, सरपंच हिरालाल जाधव यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.
फोटो
300721\1632-img-20210730-wa0058.jpg
समाज बांधवाना संबोधित करताना श्याम चैतन्य जी महाराज आणि प. पु. आचार्य कल्पवृक्ष नंनदीजी महाराज
फोटो :- अर्पण लोढा,वाकोद