नांदेड, ता. धरणगाव : गेल्या तीन ते चार दिवसांपासून नांदेडसह परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असून, शनिवारी सायंकाळी पुन्हा या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने खरिपाचा हंगाम पाण्यात गेला आहे.
खरिपाच्या पेरण्या झाल्यानंतर तब्बल दोन ते अडीच महिने पावसाने दडी मारलेली होती. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या शिडकाव्यावर पिके कशीबशी तग धरून होती. नंतर तेही बंद झाल्याने जमिनीतील कोवळ्या पिकांजवळ जमिनीला भेगा पडून पिके जळू लागली होती. परिणामी बहुसंख्य शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर ओखर फिरवला होता. आता जेमतेम जी पिके शेतीशिवारात आहेत, तीदेखील सततच्या पावसामुळे सडण्याच्या मार्गावर आहेत. जमिनीची पाणी जिरवून घेण्याची क्षमता संपलेली असल्यामुळे शेतीशिवारात सर्वदूरपर्यंत पाणीच पाणी साचून आहे. शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकांवर केलेला पेरणी, बियाणे, रासायनिक खते व आंतरमशागतीवर केलेला हजारो रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.