शिक्षण विभागातील उच्चपदस्थ रिक्त जागांवर पीएच.डी.धारक शिक्षक नियुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST2021-08-01T04:15:32+5:302021-08-01T04:15:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : संपूर्ण राज्यभरात सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांमध्ये शेकडो पीएच.डी.धारक ...

शिक्षण विभागातील उच्चपदस्थ रिक्त जागांवर पीएच.डी.धारक शिक्षक नियुक्त करा
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : संपूर्ण राज्यभरात सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांमध्ये शेकडो पीएच.डी.धारक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांनी अध्यापनाबरोबरच संशोधन केले असल्याने त्यांच्या गुणवत्तेचा उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून त्यांची नियुक्ती शिक्षण विभागातील उच्चपदस्थ रिक्त जागांवर करण्यात यावी, अशी मागणी पीएच.डी.धारक शिक्षकांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात नुकतीच मुंबई येथे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.
शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या चर्चेत आमदार डॉ. बालाजी किणीकर - कल्याण, महेश मोरे - ठाणे, ज्ञानेश्वर म्हात्रे - कोकण यांच्यासह पीएच.डी.धारक शिक्षक डॉ. राजेश पावडे - नांदेड, डॉ. जयश्री मोरे - ठाणे, डॉ. जगदीश पाटील - जळगाव आणि डॉ. बालाजी समुखराव - लातूर यांच्या शिष्टमंडळाने सहभाग घेतला.
राज्यातील विविध शाळांमध्ये कार्यरत पीएच.डी.धारक शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाने मागवावी आणि धोरणात्मक व प्रशासकीय निर्णय घ्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. पीएच.डी.धारक शिक्षकांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाईल, असे आश्वासन या वेळी मंत्री गायकवाड यांनी दिले. या वेळी शिष्टमंडळातर्फे त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या हेतूने शिक्षण विभागातील विविध उच्चपदस्थ रिक्त जागांवर पीएच.डी.धारक शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. पीएच.डी.धारक शिक्षकांना शिक्षण विभागांतर्गत येणारी वर्ग १, वर्ग २ ची पदे, डायट प्राचार्य, डायट अधिव्याख्याता, शासकीय अध्यापक विद्यालयातील प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक, एससीईआरटी, बालभारती, राज्य व विभागीय मंडळातील उच्चपदस्थ पदे, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदी रिक्त पदांवर नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.