जामनेर, जि.जळगाव : येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात बारावी कला शाखेत पुनर्प्रवेश घेतलेल्या चेतन सोनवणे या विद्यार्थ्याने शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास केकतनिंभोरे गावातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी शिक्षक व संबंधित लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आधी महाविद्यालयाबाहेर व नंतर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.मयत विद्यार्थ्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत महाविद्यालयाने आपला पुनप्रवेश रद्द केल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख त्याने केला आहे, अशी माहिती मिळाली.जबाब नोंदविलेपोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांनी याबाबत महाविद्यालयातील प्रवेशाची कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रियेशी संबंधित लिपिक व शिक्षकांचे जबाब नोंदवून घेतले.केकतनिंभोरे येथील चेतन याने जामनेर महाविद्यालयात बारावी कला शाखेत पुनर्प्रवेश घेतला, शुक्रवारी तो नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गावातील मित्रांसोबत आला होता. दुपारी तो केकतनिंभोरे गावी घरी आला व त्याने घरात गळफास घेतला.दरम्यान, महाविद्यालयाने त्याच्याकडे गॅस सर्टीफिकेटची मागणी केली होती. आज तो कॉलेजला आला असता संबंधित शिक्षकाने त्याला गॅस सर्टिफिकेट कार्यालयात जमा करण्याबाबत संबंधित लिपिकास भेटण्यास सांगितले. यात त्याला आपला प्रवेश रद्द झाल्याचे समजले. यावरून त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.त्याचा मृतदेह जामनेरला उपजिल्हारुग्णालयात आणण्यात आला. रुग्णालयाबाहेर ग्रामस्थ व विद्यार्थी जमा झाले होते. संतप्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे धाव घेतली.खिडकीचा काच फोडलाकाही विद्यार्थ्यांनी कार्यालयातील खिडकीचा काच फोडला. पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, सुनील कदम हे सहकाऱ्यांंसह महाविद्यालयात पोहचले व त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत घातली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.चेतन सोनवणे याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी केकतनिंभोरे येथे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. पोलिसांना ही माहिती समजतात उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, पहूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, उपनिरीक्षक विकास पाटील, सुनील कदम यांनी सहकाºयांसह गावाकडे धाव घेतली व आंदोलनकर्त्यांची समजूत काढली.चेतन सोनवणे याच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचा महाविद्यालयातील प्रवेश रद्द केल्याने त्याने गळफास घेतल्याचा नातेवाईकांचा संशय आहे. पोलिसांकडून तपास केला जात आहे. त्यानंतरच पुढील कार्यवाही होईल. - विकास पाटील, पोलीस उपनिरीक्षक, जामनेर
संतप्त विद्यार्थ्यांचा कॉलेज व पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 02:00 IST