सर्वच नष्ट झाले, पंचनाम्याची काय गरज?; मदतीसाठी केवळ चालढकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST2021-08-01T04:16:44+5:302021-08-01T04:16:44+5:30
जळगाव : पूरग्रस्त कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सर्वच नष्ट झाले असताना पंचनामे करायची गरज नाही, त्यांना आज तातडीची मदत मिळणे ...

सर्वच नष्ट झाले, पंचनाम्याची काय गरज?; मदतीसाठी केवळ चालढकल
जळगाव : पूरग्रस्त कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सर्वच नष्ट झाले असताना पंचनामे करायची गरज नाही, त्यांना आज तातडीची मदत मिळणे गरजेचे आहे. असे असताना राज्य सरकार केवळ चालढकल करीत असल्याचा आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात केला. महाविकास आघाडी सरकारचा ढिसाळ कारभार पाहिला तर तळीयेतील घटनेनंतर २२ तास उलटूनही तेथे तलाठी नाही की कोणताही प्रशासकीय अधिकारी पोहोचू शकला नव्हता, अशीही टीका महाजन यांनी केली.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागात पूरपरिस्थिती उद्भवल्यानंतर तेथे गिरीश महाजन यांनी मदत केल्यानंतर ते शनिवारी जळगावात आले होते. त्यांच्या उपस्थितीत पत्रकार संघाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली. यावेळी पूरग्रस्तांच्या मदतीविषयी बोलताना महाजन यांनी सरकारवर टीका केली.
संस्था सरसावल्या, सरकारचे केवळ दौरे
पूरग्रस्त भागात गंभीर परिस्थिती उद्भवल्याने त्या भागात आज लोकांच्या अंगावर कपडे नाहीत, पांघरायला काहीच नाही, असे सर्व उद्ध्वस्त झालेले असताना त्यांना तातडीची मदत मिळणे गरजेेचे आहे. मात्र, सरकार पंचनाम्यात अडकले आहे. जेेथे सर्व उद्ध्वस्त झाले आहे, तेथे पंचनाम्याची काय गरज, असा सवाल करीत पूरग्रस्तांना आज तातडीच्या मदतीची गरज असल्याचे महाजन म्हणाले. अशा परिस्थितीत त्या भागात अनेक संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत, मात्र सरकार केवळ दौरे करीत असल्याची टीकादेखील महाजन यांनी केली.
विरोधी पक्ष जातात म्हणून सरकारचाही सोपस्कार
पूरग्रस्तांच्या भेटीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व अन्य विरोधी पक्षातील नेते जात असल्याने मुख्यमंत्री व इतर मंत्रीही दौरे करीत असल्याची टीका महाजन यांनी केली. मात्र त्यातून पूरग्रस्तांच्या पदरी काहीच पडले नसल्याचे ते म्हणाले. पूरग्रस्तांना मदतीची गरज असल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान नागरिक संतापले होते. त्यावेळी त्यांना आधार देण्याऐवजी भास्कर जाधव कशा पद्धतीने बोलले हे सर्वांनी पाहिल्याचेदेखील महाजन म्हणाले.
आम्ही पोहोचू शकतो, प्रशासन का नाही?
तळीयेच्या घटनेविषयी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही तेथे पोहोचलो. मात्र घटनेच्या २२ तासांनंतर तेथे प्रशासकीय अधिकारी नाही, की सरकारमधील कोणीही पोहोचले नव्हते. आम्ही जाऊ शकतो, मग मदतीसाठी सरकार का पोहोचू शकत नाही, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. नागरिकांच्या मदतीने आम्ही तेथे ३२ मृतदेह काढले, तोपर्यंत कोणीही पोहोचले नसल्याचे महाजन म्हणाले.
संजय राऊत यांचे समर्थन दुर्दैवी
शिवसेनेत गुंड असल्याचे समर्थन खासदार संजय राऊत करीत असतील तर हे दुर्दैव आहे. सत्ताधारी पक्षाने असे व्यक्तव्य करीत असल्यास काय बोलणार, अशी टीका महाजन यांनी केली.