घरफोडीत पाच लाख रुपये गेल्यानंतर सेफ्टी लाॅक बसविले आता लाखो रुपये वाचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST2021-07-31T04:18:16+5:302021-07-31T04:18:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भुसावळ येथे सासऱ्याकडे गेलेले दादाराव देवीदास सोनवणे यांच्या बंद निवासस्थानाच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरीचा ...

घरफोडीत पाच लाख रुपये गेल्यानंतर सेफ्टी लाॅक बसविले आता लाखो रुपये वाचले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भुसावळ येथे सासऱ्याकडे गेलेले दादाराव देवीदास सोनवणे यांच्या बंद निवासस्थानाच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास सुनंदिनी पार्क येथे उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दाेन वर्षांपूर्वी या घरात घरफोडी झाली होती. त्यावेळी पाच लाख रुपये चोरट्यांनी लांबविले होते. त्यानंतर सेफ्टी लाॅक बसविले. या गुन्ह्याचा तपास लागत नाही तोच दुसऱ्यांदा याच घरफोडीचा प्रयत्न झाला.
जुना खेडी रस्ता परिसरातील सुनंदिनी पार्क येथे दादाराव सोनवणे हे पत्नी व दोन मुलींसह वास्तव्यास आहेत. शेतीसाठी लागणारे खते आणि औषध बनवून ते विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. दरम्यान, अधून-मधून ते भुसावळ येथील सासऱ्याकडे ये-जा करीत असतात. बुधवारी ते घराला कुलूप लावून कुटूंबासह भुसावळ येथे गेले होते. त्यामुळे घरी कुणीही नव्हते. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरा मागील रहिवासी किरण भावसार हे पायी जात असताना, त्यांना सोनवणे यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसून आला. त्यांनी लागलीच सोनवणे यांना संपर्क साधून चोरीचा प्रयत्न झाल्याचे कळविले.
दोन दरवाजांचे कुलूप तोडले
घटनेची माहिती मिळाल्यानंतर दादाराव सोनवणे यांनी लागलीच कुटूंबासह जळगाव गाठले. घरी पोहोचल्यानंतर त्यांना कंपाऊंडचे कुलूप व घराचा मुख्य लाकडी दरवाजाच्यासोबत असलेले लोखंडी दरवाजाचे कडी-कोयंडा व कुलूप तोडलेले आढळून आले. तर एक कुलूप चोरट्यांनी गटारीत फेकल्याचेही त्यांना आढळून आले.
सेफ्टीलॉक न तुटल्याने चोरटे खाली हात परतले
चोरट्यांना दोन दरवाजांचे कुलूप तोडण्यात यश आले. परंतु, मुख्य लाकडी दरवाजाचे सेफ्टीलॉक तीन वेळा टॅमीच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ते अयशस्वी ठरले. त्यामुळे चोरट्यांना खाली हातचं तेथून परतावे लागले.
दोन वर्षाआधी ५ लाखांचा ऐवज लांबविला
२ जानेवारी २०१९ च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात डल्ला मारला होता. त्यावेळी चोरट्यांनी ४ लाख रुपयांची रोकड व एक लाख रुपयांचे दागिने असे एकूण पाच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. आता ही दुसऱ्यांदा चोरी झाली असल्याची माहिती दादाराव सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.