गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिख बांधवांनी बुजले स्वखर्चाने खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 23:19 IST2019-11-09T23:18:01+5:302019-11-09T23:19:22+5:30
शहरातील अत्यंत दयनीय स्थिती झालेल्या खड्डेमय रस्त्यासंदर्भात वारंवार निवेदन, आंदोलन करूनसुद्धा काही उपयोग होत नाही या वादात न पडता, गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिख बांधवांनी स्वत: पुढाकार घेत स्वखर्चाने शहरातील मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविले.

गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिख बांधवांनी बुजले स्वखर्चाने खड्डे
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : शहरातील अत्यंत दयनीय स्थिती झालेल्या खड्डेमय रस्त्यासंदर्भात वारंवार निवेदन, आंदोलन करूनसुद्धा काही उपयोग होत नाही या वादात न पडता, गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिख बांधवांनी स्वत: पुढाकार घेत स्वखर्चाने शहरातील मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविले. यामुळे पालिका प्रशासनाला अप्रत्यक्ष चपराक मिळाली आहे.
शहरात जळगाव रोड, यावल रोड, वरणगाव रोड, जामनेर रोडसह सर्वच प्रवेश मार्गावरील रस्त्यांची अत्यंत दैनावस्था झाली आहे. काही ठिकाणी तर दीड फूट खोल तर चार फूट लांब अशा पद्धतीचे रस्ते आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यावर चालणेदेखील कठीण झाले आहे. या परिस्थितीमध्ये नागरिकांची हाडे खिळखिळी झालेली आहे. पाठीचे आजार जडले आहे. शहरातील खड्डे बुजवावे याकरिता विविध प्रभागातील नागरिकांनी पालिका प्रशासनावर मोर्चे आणले, निवेदन दिले. विनंती केली. परंतु काही उपयोग झाला नाही. यात मात्र वेळ वाया गेला.
या वादात न पडता शिख बांधवांतर्फे गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर ज्या मार्गावरून मिरवणूक काढण्यात येते तेथे मिरवणुकीत व्यत्यय नको म्हणून शिख समाजबांधवांनी स्वत: पुढाकार घेत श्रमदान केले. जळगाव रोडवरील गुरुद्वारापासून गरुड प्लॉट, हंबर्डीकर चौक, स्टेशन रोड, बाजारपेठ चौक, वाल्मीक नगर तसेच एचडी फिल्म एचडीएफसी बँकेच्या वळणावरील अनेक खड्डे श्रमदान स्वखर्चाने बुजले.