प्राणघातक हल्ला प्रकरणात अॅड.विजय पाटील यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 21:38 IST2019-09-10T21:35:58+5:302019-09-10T21:38:14+5:30
मराठा विद्या प्रसारक संस्था अर्थात ‘मविप्र’ तील वादातून नूतन मराठा महाविद्यालयात झालेल्या हाणामारी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अॅड.विजय भास्करराव पाटील यांना मंगळवारी दुपारी पांडे चौकातून अटक केली. अचानक झालेल्या अटकेमुळे पाटील समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

प्राणघातक हल्ला प्रकरणात अॅड.विजय पाटील यांना अटक
जळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्था अर्थात ‘मविप्र’ तील वादातून नूतन मराठा महाविद्यालयात झालेल्या हाणामारी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अॅड.विजय भास्करराव पाटील यांना मंगळवारी दुपारी पांडे चौकातून अटक केली. अचानक झालेल्या अटकेमुळे पाटील समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
‘मविप्र’ संस्थेचा ताबा घेण्याच्या कारणावरुन भोईटे व नरेंद्र पाटील गटात १९ जून २०१८ रोजी तुफान हाणामारी झाली होती. दोन्ही गटाकडून एकमेकावर तुफान दगडफेक झाली. दरम्यान, प्रचंड जमाव झाल्याने त्यांना हटविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. या वादामुळे परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटाच्या ३३ जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
१७ जणांना अटकपूर्व मंजूर; एकाचे नाव वगळले
या प्रकरणात पाटील गटाच्या २८ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी हेमंतकुमार साळुंखे यांना १४ आॅगस्ट २०१८ रोजी अटक झाली होती. ते सध्या जामीनावर आहेत तर अॅड.भरत देशमुख यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे. १७ जणांनी यापूर्वीच अटकपूर्व जामीन मिळविला आहे. त्यामुळे अॅड.विजय पाटील, मनोज भास्कर पाटील, पियुष नरेंद्र पाटील, संजय भास्कर पाटील (रा.दीक्षितवाडी) बाळू चव्हाण (रा.कानळदा), अरुण रामचंद्र पाटील व विनोद पंजाबराव देशमुख यांनी अटक झालेली नव्हती. अॅड.विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन खंडपीठाने फेटाळून लावला आहे.
पांडे चौकातून घेतले ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार अशोक महाजन, सुरेश महाजन, अनिल देशमुख, विनोद पाटील, संजय सपकाळे, सूरज पाटील, प्रमोद लाडवंजारी, महेश पाटील व संदीप साळवे यांच्या पथकाने अॅड.विजय पाटील यांना पांडे चौकातून ताब्यात घेऊन पोलीस वाहनातून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणले. तेथे पोलीस निरीक्षक बापू रोहोम व जिल्हा पेठचे निरीक्षक अकबर पटेल यांनी पुढील कार्यवाही केली.