शिवसेनेकडून ॲड.उज्ज्वल निकमांना राजकारणासाठी गळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST2021-07-11T04:12:37+5:302021-07-11T04:12:37+5:30
जळगाव : राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राजकारणात यावे यासाठी शिवसेनेकडून त्यांना गळ घालण्यात आली असून, जळगाव ...

शिवसेनेकडून ॲड.उज्ज्वल निकमांना राजकारणासाठी गळ
जळगाव : राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राजकारणात यावे यासाठी शिवसेनेकडून त्यांना गळ घालण्यात आली असून, जळगाव दौऱ्यावर आलेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ॲड. निकम यांची घरी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. सरकारी दौऱ्यातही त्याचा उल्लेख नव्हता. गेल्या महिन्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही जळगावात आल्यावर ॲड. निकम यांची भेट घेतली होती.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ॲड. उज्ज्वल निकम यांना दोन वेळा राज्यसभेची ऑफर दिली होती, मात्र तेव्हा त्यांनी नकार दिला होता. सेलेब्रिटींना आपल्या पक्षात खेचण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. शिवसेना नेते संजय राऊत गेल्या महिन्यात जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी ॲड. निकम यांची भेट घेतली होती व तेव्हादेखील याच विषयावर दीर्घकाळ चर्चा झाली होती. या भेटीची बातमी कोणालाच कळली नव्हती. राऊत व आपली भेट झाल्याच्या वृत्तास निकम यांनी ‘लोकमत’जवळ दुजोरा दिला आहे, मात्र चर्चेचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. राज्यसभेत शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी देण्याचा पहिला प्रस्ताव आहे. त्याशिवाय चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आरक्षण उठल्यास हा मतदारसंघ खुला होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चोपड्याचाही पर्याय ठेवण्यात आलेला आहे.
पालकमंत्री बाहेर; बंदद्वार चर्चा
एकनाथ शिंदे यांचा ताफा ॲड. निकम यांच्या घरी गेला तेव्हा सोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी होते. या सर्वांसमक्ष पाच मिनिटे स्वागत समारंभ झाला. त्यानंतर स्वत:च शिंदे यांनी आम्हाला बंदद्वार चर्चा करायची आहे, असे सांगितल्याने पालकमंत्री व इतर आमदार सर्वच बाहेर आले. दहा मिनिटे निकम व शिंदे यांच्यात चर्चा झाली. दरम्यान, या वेळी शिंदे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी निकम यांचे भ्रमणध्वनीवर बोलणे करून दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ताफा पाचोऱ्याच्या दिशेने रवाना झाला.
कोट...
राजकारणात प्रवेशाचा अजून तरी विचार केलेला नाही. एकनाथ शिंदेंसोबत बंदद्वार चर्चा झाली, मात्र त्याचा तपशील सांगता येणार नाही. याआधीदेखील शरद पवार यांनी प्रस्ताव ठेवला होता, मात्र तेव्हाही आपण नकार दिला होता. खासदार संजय राऊत यांनीही गेल्या महिन्यात सदिच्छा भेट घेतली होती. सर्वच पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध असल्याने ते घरी येतात.
- उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील