पोटात चाकू खुपसून प्रौढाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 19:40 IST2021-01-02T19:40:36+5:302021-01-02T19:40:46+5:30

खुनाबाबत संशय : तपासातच उलगडणार रहस्य

Adult dies after stabbing in the stomach | पोटात चाकू खुपसून प्रौढाचा मृत्यू

पोटात चाकू खुपसून प्रौढाचा मृत्यू

जळगाव : पोटात चाकू खुपसल्याने गंभीर दुखापत होऊन लक्ष्मण महादू पाटील (५५,रा.खेडी बु.) या प्रौढाचा मृत्यू झाला असून ही घटना खून आहे की पाटील यांनीच स्वत: च्या हाताने पोटात चाकू खुपसला आहे, याबाबत पोलीसही संभ्रमात आहेत. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात गंभीर दुखापतीमुळे मृत्यू म्हटले असून नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. ही घटना १ जानेवारी रोजी रात्री घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण पाटील हे अविवाहित होते. उधना, सुरत येथे ते वास्तव्याला होते. दोन महिन्यापासून ते खेडीत आले होते. पुतण्या ज्ञानेश्वर अशोक पाटील यांच्याकडे ते वास्तव्याला होते. भाजीपाला विक्री करायचे. शुक्रवारी ते मद्याच्या नशेत होते. दारु पिण्यासाठी त्यांनी कुटुंबाकडे पैसे मागितले, त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर पोटात चाकू मारल्याची घटना घडली. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यिकीय अधिकारी डॉ.रेणुका भंगाळे यांनी त्यास मृत घोषीत केले.
या घटनेबाबत गुंतागुंत निर्माण झाल्याने अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसीचे निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन नेमका चाकू कोणी मारला याची चौकशी करुन शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांकडूनही माहिती घेतली. पुतण्या, त्याची पत्नी व इतरांचे जबाब घेण्याचे काम शनिवारी सुरु होते. घटना नेमकी काय आहे, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. उपनिरीक्षक विशाल वाठोरे व सचिन मुंडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Title: Adult dies after stabbing in the stomach