रस्ते दुरुस्तीच्या कामांचा वेग वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST2021-07-31T04:18:38+5:302021-07-31T04:18:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून, मनपाकडून रस्ते दुरुस्ती तरी करण्यात यावी ...

रस्ते दुरुस्तीच्या कामांचा वेग वाढवा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून, मनपाकडून रस्ते दुरुस्ती तरी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांचा वाढत जाणारा रोष पाहता शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिले होते. मात्र, कामांची गती नसल्याने पुन्हा ठेकेदार व मनपा अभियंत्यांची बैठक घेऊन शहरातील दुरुस्तीच्या कामांच वेग वाढविण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.
महापौरांच्या दालनात गुरुवारी मनपा अभियंता, अधिकारी व ठेकेदारांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, चेतन संकत, शहर अभियंता अरविंद भोसले, विलास सोनवणे,नरेंद्र जावळे, मनीष अमृतकर, प्रकाश पाटील, संजय पाटील, जितेंद्र रंधे, गोपाळ लुळे, योगेश वाणी आदी उपस्थित होते. या बैठकीत शहरात सुरू असणारी डागडुजीची तसेच अन्य कामांबाबत आढावा घेण्यात आला. यात मक्तेदारांनी काही समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने बिल संबंधित थर्ड पार्टी तपासणी रिपोर्ट, कामांना देण्यात येणारा अग्रक्रम या समस्या मांडण्यात आल्या. या समस्यांवर मात करून त्यांनी कामाचा वेग वाढवावा, असे निर्देश महापौर आणि उपमहापौरांनी दिले. दरम्यान, शहरातील अनेक भागात मुरूम व खडीच्या सहाय्याने रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून, या कामांची गुणवत्तादेखील तपासण्याचा सूचना उपमहापौरांनी दिल्या आहेत.