गायीच्या पोटातून काढला तब्ब्ल ४० किलो प्लास्टिक कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST2021-07-28T04:16:49+5:302021-07-28T04:16:49+5:30
जळगाव : घरासमोर बसलेल्या गायीची प्रकृती खराब असल्याचे जाणवताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारासाठी बोलावून समर्थ काॅलनीतील वाणी कुटुंबीयांनी तत्परता दाखविली. ...

गायीच्या पोटातून काढला तब्ब्ल ४० किलो प्लास्टिक कचरा
जळगाव : घरासमोर बसलेल्या गायीची प्रकृती खराब असल्याचे जाणवताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारासाठी बोलावून समर्थ काॅलनीतील वाणी कुटुंबीयांनी तत्परता दाखविली. या गायीच्या पोटातून तब्बल ४० किलोचा प्लास्टिक कचरा काढण्यात डाॅक्टरांना यश आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान या गायीचा मृत्यू झाला. बेवारस जनावरांसाठी प्लास्टिक कचरा कसा घातक ठरतोय, हे या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहे.
शहरातील समर्थ कॉलनीत राहणारे मिलिंद वाणी यांच्या घरासमोर रविवारी सकाळपासून दोन बेवारस गायी बसलेल्या होत्या. यातील एक गाय उठून दुसरीकडे गेली तर एक गाय दुपारी चार वाजल्यानंतरही जागेवरच बसून होती. वाणी यांनी या गायीजवळ जाऊन पाहिले असता त्यांना गाय आजारी असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ महाबळ येथील पशु वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांना उपचारासाठी बोलावले. यावेळी संबंधित डॉक्टरांनी गायीवर उपचार करून, ही गाय वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगत गाईला कोंडवाड्यात सोडण्यास सांगितले. यानंतर वाणी यांनी या गायीची माहिती पांझरपोळ गोशाळेचे संचालक विजय काबरा यांना दिली. काबरा यांनी तत्काळ गायीला पांझरपोळ संस्थेत आणण्यास सांगितले.
इन्फो :
डॉक्टरांनी गायीच्या पोटातून काढले ४० किलो प्लास्टिक
मिलिंद वाणी, आदित्य वाणी, अभिषेक वाणी, रोहन नेवे तसेच त्यांचे इतर सहकारी भवानी अग्रवाल, जयेश मित्तल, राज नावडे, लतेश भोळे, ऋषिकेश रावेरकर यांनी एका गाडीतून या गायीला पांझरपोळ गोशाळेत दाखल केले. या ठिकाणी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज राजपूत व डॉ. अश्विनी दाभाडे यांनी या गायीवर शस्त्रक्रिया केली. तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करून प्लास्टिक पिशव्यांचा कचरा, वायर आदी प्रकारचा ४० किलो कचरा काढण्यात आला.
इन्फो :
शस्त्रक्रियेनंतर काही तासातच गायीने सोडले प्राण
डॉक्टरांनी तत्काळ गायीवर शस्त्रक्रिया केली. मात्र, प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे गायीच्या पोटात मोठ्या प्रमाणात इजा झाल्यामुळे प्रकृती अधिकच खालावली होती. शस्त्रक्रिया करून पोटातील प्लास्टिक काढल्यानंतर गायीने काही तासातच प्राण सोडले.
इन्फो :
प्लास्टिक पिशव्या उघड्यावर न फेकण्याचे आवाहन
शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली असली तरी, शहरात बिनधास्तपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे. नागरिक या पिशव्या उघड्यावरच फेकत असल्यामुळे, बेवारस जनावरे या पिशव्या खात आहेत. त्यामुळे या पिशव्या बेवारस जनावरासांठी घातक ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या उघड्यावर फेकू नये, असे आवाहन पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.