लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एकीकडे कोरोनाने वैद्यकीय, स्वच्छता यावरील खर्च वाढण्यासह उत्पन्नात कपात झाली असताना महागाई दररोज उच्चांकी गाठत असून, सामान्यांना जगणे कठीण होत आहे. कोरोनाचा संसर्ग पसरला त्या मार्च २०२० पासून ते आजपर्यंतचा महागाईचा चढता आलेख पाहिला तर दीडपटीने केवळ खाण्या-पिण्याचा खर्च वाढला आहे. वैद्यकीय उपचार, वीज बिल या खर्चाचा विचार केला तर कोठेच ताळमेळ बसताना दिसत नसून, बचत तर आता केवळ स्वप्नच राहू पाहत आहे.
मागणी व पुरवठ्यावर बाजारपेठेचे गणित अवलंबून असते. पुरवठा कमी झाला व मागणी वाढल्यास भाववाढ होणे स्वाभाविक असते. कोरोना काळापासून लॉकडाऊनच्या भीतीने मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ लागल्याने भाववाढ झाली ती नंतर मात्र काही कमी झाली नाही. सध्याच्या भाववाढीला या सोबतच सर्वांत महत्त्वाचे कारण ठरत आहे ते म्हणजे इंधन दरवाढ.
खाद्यतेलात कधी नव्हे एवढी वाढ
घर असो अथवा हॉटेल, या प्रत्येक ठिकाणी दररोज हमखास लागणारा घटक म्हणजे खाद्यतेल. महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला सर्वाधिक खर्च करावा लागत आहे तो एकट्या खाद्यतेलावर. त्यात यामध्येच कधी नव्हे एवढी मोठी वाढ दीड वर्षात झाली आहे. खाद्यतेलामध्ये सर्वाधिक वापर होतो तो सोयाबीन तेलाचा. या तेलाचे भाव कमी-जास्त झाले तरी ते ५ ते १० रुपयांच्या मर्यादेत असायचे. त्यामुळे हे तेल गेल्या काही वर्षांत ७५ ते ९५ रुपये प्रतिकिलोदरम्यान राहिले. मात्र, कोरोना सुरू झाल्यापासून मार्च २०२० ते सप्टेंबर २०२१ या दीड वर्षाच्या काळात या तेलाच्या भावात ६० रुपये प्रतिकिलोने वाढ होऊन ते थेट १५५ रुपयांपर्यंत पोहोचले. तीन वर्षांत २० रुपयांपर्यंतची वाढ असणाऱ्या या तेलाच्या भावात पूर्वीच्या वाढीच्या निम्म्या काळात तीनपटीने वाढ झाली, हे विशेष. शेंगदाणा तेलाचाही विचार केला तर या तेलातही ६० रुपये प्रतिकिलोने दीड वर्षात वाढ होऊन ते १९५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. खाद्यतेलातील ही भाववाढ सर्वांनाच चक्रावणारी आहे.