'वाघूर'च्या कुशीत शेततळ्यांचे गाव! एका शेततळ्यात ३० लाख लीटर पाणी साठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 06:46 IST2025-02-27T06:46:47+5:302025-02-27T06:46:58+5:30
'वाघूर' प्रकल्पाअंतर्गत असलेल्या शाखांच्या माध्यमातून हा प्रयोग राबविला जात आहे.

'वाघूर'च्या कुशीत शेततळ्यांचे गाव! एका शेततळ्यात ३० लाख लीटर पाणी साठा
- कुंदन पाटील,
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वाघूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत जामनेर तालुक्यात जलसंपदा विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विनामूल्य ३,८३० शेततळी उभारले जात आहेत. या शेततळ्यांच्या माध्यमातून १९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. एकाच तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात विनामूल्य शेततळे उभारणीचा प्रयोग देशात पहिल्यांदाच राबविला जात आहे.
'वाघूर' प्रकल्पाअंतर्गत असलेल्या शाखांच्या माध्यमातून हा प्रयोग राबविला जात आहे. उपसा प्रणालीसह पाणीवापर संस्थेतील सभासद असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीत तळे उभारण्याचा संपूर्ण खर्च जलसंपदा विभाग करीत आहे. विशेष म्हणजे, जलसंपदा विभाग या शेततळ्यांची ९ वर्षे विनामूल्य देखभाल करणार आहे.
आतापर्यंत १६० शेततळे पूर्ण; ३० लाख लीटर पाणी
शेतकऱ्यांना वर्षातून ८ वेळा नाममात्र शुल्क आकारून शेततळ्यात पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. मे अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यातील २,०२० शेततळे पूर्णत्वास नेले जाणार आहेत. आतापर्यंत १६० शेततळे पूर्ण झाले असून, प्रत्येक शेततळ्यात ३० लाख लीटर पाण्याचे सिंचन केले आहे.
अशी आहे योजना
वाघूर योजना क्र. १
लाभक्षेत्र : १०,१०० हेक्टर शेततळे : २,०२०
वाघूर योजना क्र.२
लाभक्षेत्र: ९,०३२ हेक्टर शेततळे : १,८१०
३० लाख लीटर पाण्यासाठी हंगामनिहाय दर (रुपयांत)
खरीप
५२८
रब्बी
१,०५६
उन्हाळी
१,५८४