मद्यपी मुलाकडून कट्टा हिसकावताना आईलाच लागली गोळी, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
By विलास बारी | Updated: November 12, 2023 20:40 IST2023-11-12T20:39:51+5:302023-11-12T20:40:49+5:30
या प्रकरणी रोहित सोनवणे याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात १२ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मद्यपी मुलाकडून कट्टा हिसकावताना आईलाच लागली गोळी, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : मद्याच्या नशेत हाती गावठी कट्टा घेऊन घरी आलेल्या मुलाच्या हातून कट्टा हिसकावताना कलाबाई प्रकाश सोनवणे (६०, रा. शिवाजीनगर) यांच्याच हाताला गोळी लागली. ही घटना शनिवार, ११ नोव्हेंबर रोजी रात्री शिवाजीनगरात घडली. या प्रकरणी रोहित सोनवणे याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात १२ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव महापालिकेतून आरोग्य सेविका म्हणून निवृत्त झालेल्या कलाबाई सोनवणे या पती, दोन मुले, दोन सुनांसह शिवाजीनगर भागात राहतात. ११ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा रोहित हा मद्याच्या नशेत गावठी कट्ट्यासह दिसला. त्या वेळी कलाबाई यांनी मुलाच्या हातातून कट्टा हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत कट्ट्यातून गोळी सुटली व ती कलाबाईच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ लागल्याने दुखापत झाली. रक्तस्त्राव होत असताना सुनेने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे शस्त्रक्रिया करून हातातील गोळी काढण्यात आली. या प्रकरणी कलाबाई यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रोहित सोनवणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.