वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, दवाखान्यातील कागदपत्रांची पिशवी होती सोबत
By सुनील पाटील | Updated: October 13, 2022 12:04 IST2022-10-13T11:58:20+5:302022-10-13T12:04:00+5:30
गुणवंत पाटील हा तरुण रस्त्याने पायी जात होता. त्याच्याजवळ दवाखान्याच्या उपचाराचा कागदपत्रे असलेली पिशवी होती.

वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, दवाखान्यातील कागदपत्रांची पिशवी होती सोबत
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरी पुलाजवळ पायी चालणाऱ्या गुणवंत पाटील (वय २६, रा.डोंबिवली, जि.ठाणे) या तरुणाला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी १० वाजता झाला. मयताची पूर्ण ओळख पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणवंत पाटील हा तरुण रस्त्याने पायी जात होता. त्याच्याजवळ दवाखान्याच्या उपचाराचा कागदपत्रे असलेली पिशवी होती. या अपघाताची माहिती डायल ११२ वर मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे किरण अगोने व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. गुणवंत याच्या पोटावरुन चाक गेले आहे. कागदपत्रांवरुन तो डोंबिवलीचा रहिवाशी असून कल्याण येथे उपचार घेतले आहेत. सात बारा उतारा देखील या पिशवीत मिळून आलेला आहे. तो जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी किंवा नातेवाईक असावा असाही अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कागदपत्रांवरुन त्याची पूर्ण ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.