एरंडोल तालुक्यात ८ हजार ४१४ विद्यार्थ्यांनी उघडले जिल्हा बँकेत खाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:49+5:302021-07-14T04:19:49+5:30
एरंडोल : उन्हाळी सुट्टीतील पोषण आहारऐवजी बँक खात्यात पैसे जमा करण्यासंदर्भात तालुक्यात ११८ शाळांमधील विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याचे काम ...

एरंडोल तालुक्यात ८ हजार ४१४ विद्यार्थ्यांनी उघडले जिल्हा बँकेत खाते
एरंडोल : उन्हाळी सुट्टीतील पोषण आहारऐवजी बँक खात्यात पैसे जमा करण्यासंदर्भात तालुक्यात ११८ शाळांमधील विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याचे काम सुरू आहे. वास्तविक, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये सदर खाते उघडणे आवश्यक होते. परंतु, शून्य शिलकीवर खाते उघडण्याची राष्ट्रीयीकृत बँक प्रशासनाची मानसिकता नाही. तसेच या बँकांमध्ये पालकांना बँकेत बोलवतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळणे आवश्यक आहे. याउलट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या योजनेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
शिक्षक, विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या आधारकार्डची झेरॉक्स, बोनाफाइड, दोघांचे फोटो जमा करून बँकेचा फॉर्म भरून जमा करण्याचे काम करीत आहेत.
एरंडोल तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात जिल्हा बँकेच्या कासोदा, खर्ची, उत्राण, आडगाव यांच्यासह दहा ते बारा शाखा आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांची सोय झाली आहे.
एरंडोल तालुक्यात या योजनेचे एकूण १८ हजार ८४८ लाभार्थी असून सर्वांचे बँक खाते उघडणे सुरू आहे. आतापर्यंत ८ हजार ४१४ इतक्या विद्यार्थ्यांची खाती उघडण्यात आली आहे. ५ हजार ३४० अर्ज बँकेत जमा करण्यात आले आहेत. अजून ५ हजार ३९३ विद्यार्थ्यांची खाती उघडणे बाकी आहे. त्यासाठी विद्यार्थी व पालक यांचे आधार कार्ड व फोटो आवश्यक असून शिक्षकच खाते उघडण्याचे काम करीत आहे.
मे महिन्याच्या शालेय पोषण आहारऐवजी थेट विद्यार्थी खात्यावर पैसे जमा करण्याचा शासन आदेश आहे. म्हणून शाळांनी बँक खाते उघडणे सुरू केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांबरोबरच पोस्टाचे ऑनलाइन खातेसुद्धा चालणार आहे. तसेच जेडीसीसी बँक विद्यार्थ्यांची खाती उघडून देत आहे.