मेहरुण तलाव परिसरातील ७० लाखांचे वृक्ष जळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:26 IST2021-02-06T04:26:49+5:302021-02-06T04:26:49+5:30
ऑक्सिजन पार्क नावालाच : मनपाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अमृत अंतर्गत शहरातील विविध भागांत ऑक्सिजन पार्क तयार ...

मेहरुण तलाव परिसरातील ७० लाखांचे वृक्ष जळाले
ऑक्सिजन पार्क नावालाच : मनपाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अमृत अंतर्गत शहरातील विविध भागांत ऑक्सिजन पार्क तयार करण्यात येत आहे. मेहरुण तलाव परिसरातदेखील दीड वर्षापूर्वी ऑक्सिजन पार्क अंतर्गत ७० लाखांची निविदा काढून या भागात सुमारे १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. मात्र, दीड वर्षानंतर या ठिकाणचे ९० टक्के वृक्ष जळाले आहेत. तर काही ठिकाणी केवळ वृक्षांच्या काड्या शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे मनपाचे ७० लाख रुपये पाण्यातच गेल्याचे दिसून येत आहे.
‘लोकमत’ चमूने या भागात जाऊन पाहणी केली असता, मनपाच्या या वृक्षारोपणाचे पितळ उघडे पडले. ऑक्सिजन पार्कसाठी ७० लाख रुपयांची निविदा काढून तलावाभोवती वृक्ष लावण्याचे काम देण्यात आले आहे. या निविदेनुसार मक्तेदाराला या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, ९० टक्के वृक्ष जळाले आहेत.
खड्डेच खोदले, वृक्षलागवडच नाही
या पाहणीत या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, ५० टक्के खड्ड्यांमध्ये वृक्षांची लागवडच झाली नसल्याचे या पाहणीच्या वेळी आढळून आले. त्यामुळे हे खड्डे केवळ नावालाच खोदण्यात आले असून, अजूनही वृक्ष लागवडीच्या प्रतीक्षेत असल्याचेच दिसून आले.
ना संगोपन, ना देखभाल
मेहरुण भागातील रोहिदास भोई हे मेहरुण तलाव परिसरात दररोज सकाळी व सायंकाळी फिरायला येतात. त्यांनी सांगितले की, या ठिकाणी वृक्षांची लागवड केल्यानंतर त्या वृक्षांकडे मनपा किंवा इतर कोणत्याही मक्तेदाराने फिरकूनदेखील पाहिले नाही. काही थोडे-थोडके वृक्ष जगले आहेत. कारण या ठिकाणी अनेक पर्यावरण प्रेमींकडून या वृक्षांना पाणी दिले जात होते. तसेच विशेष लक्ष दिले जात होते. त्यामुळे ठरावीक वृक्ष जगले आहेत. मनपाने लक्ष दिले असते तर कदाचित अनेक वृक्ष या ठिकाणी जगले असते, अशी माहिती भोई यांनी दिली.
मोठे वृक्ष जगले
ऑक्सिजन पार्कमध्ये जे मोठे वृक्ष लावण्यात आले होते त्यापैकी काही वृक्ष जगले आहेत. मात्र, जॉगिंग ट्रॅकलगत लावण्यात आलेले जवळपास सर्वच वृक्ष जळाले आहेत.