५६ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST2021-08-13T04:20:21+5:302021-08-13T04:20:21+5:30
संजय सोनार चाळीसगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षांपासून शाळा बंद आहेत. शाळा लवकरच उघडणार असल्याचे शासनाने जाहीर ...

५६ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पुस्तके
संजय सोनार
चाळीसगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षांपासून शाळा बंद आहेत. शाळा लवकरच उघडणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचे नियोजन आहे. तालुक्यात एकूण ५६ हजार ९९४ विद्यार्थ्यांना मोफत एकूण तीन लाखांवर पुस्तकांचा लाभ मिळणार मिळणार आहे. त्यात मराठीमाध्यमाच्या ५४ हजार व उर्दू माध्यमाच्या दोन हजारांवर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुढील आठवड्यात ही पुस्तके विद्यार्थ्यांना मिळणार असून, त्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून सुरू आहे.
चाळीसगाव तालुक्यात जि.प.च्या १९०, नपा ९, तर अनुदानित माध्यमिक शाळा ६९ शाळा आहेत. या शाळांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळत नाही. पहिली ते आठवीपर्यंतच्या ५७ हजार ७३३ मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळणार आहेत. यंदा कुठल्याच वर्गाचा अभ्यासक्रम बदलला नाही. त्यामुळे सर्वची सर्व पुस्तके येथील गटशिक्षण कार्यालयास उपलब्ध झाली असून, लवकरच ही पुस्तके तालुक्यातील शाळांना पोहोच केली जात आहेत. शाळा सुरू होण्याच्या दोन महिने आधी शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची संख्या आणि पुस्तकांची यादी मागविली जाते. ज्या शाळांनी २०२०-२१ मध्ये मोफत पुस्तकांसाठी माहिती भरली आहेत त्या शाळांना या मोफत पुस्तक योजनेचा लाभ मिळणार आहे.
गेल्या वर्षांपासून कोरोनामुळे सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी पुस्तकांचा पुरवठा झाला नव्हता. आता कोरोना रुग्णांची संख्या घटली असून, शाळा सुरू होण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. त्यानुसार शाळा सुरू करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून सुरू झाले आहेत.
(कोट)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. तालुक्यात एकूण तीन लाख पुस्तके वाटप करण्यात येणार आहे. मागणी केल्याप्रमाणे पुस्तकांचा पुरवठा झाला असून, पुढील आदेश आल्यानंतर मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात येईल. -विलास भोई, गटशिक्षणाधिकारी, चाळीसगाव.
फोटो ओळी:
चाळीसगाव शिक्षण विभागाला वाटपासाठी आलेली पुस्तके पाहताना पंकज रणदिवे व विलास भोई.