35 corona deaths in two days | दोन दिवसांत ३५ कोरोनाबाधितांचा मृत्यू

दोन दिवसांत ३५ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मृत्यू वाढले : शहरातील पाच बाधितांचा समावेश, २८७ नवे कोरोनाबाधित

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात ३५ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत. शनिवारी दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक मृत्यू नोंदविण्यात आले. जिल्ह्यातील १८ मृत्यूंमध्ये जळगाव शहरातील पाच बाधितांचा समावेश आहे. दरम्यान, शहरात २८७ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

चोपड्यात शनिवारी १३ बाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान, पोर्टलवर नोंद न झाल्यामुळे ही संख्या कमी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या घटत असल्याचे सकारात्मक चित्र असल्याचेही बोलले जात आहे. दुसरीकडे गेल्या महिनाभरापासून दहापेक्षा ते पंधरापेक्षा कमी मृत्यू २४ तासांत नोंदविण्यात येत आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांत अनुक्रमे १७ व १८ बाधितांचे मृत्यू झाले आहेत. हे मृत्यू थांबविणे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. उशिरा रुग्णालयात दाखल होणे हे एक प्रमुख कारण यात सांगितले जात आहे. जळगाव शहरात शनिवारी २६५ रुग्ण बरे झाले. मृतांमध्ये ६२, ७१, ८९ वर्षीय पुरुष तर ६० व ८० वर्षीय महिला यांचा समावेश आहे. यासह यावल, चोपडा तालुक्यात प्रत्येकी ३, जळगाव ग्रामीण, रावेर तालुका प्रत्येकी २ तर धरणगाव, भुसावळ, अमळनेर तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

ऑक्सिजनवरील रुग्ण : १५३९

अतिदक्षता विभागातील रुग्ण : ६४५

लक्षणे असलेले रुग्ण २६६२

गृह विलगीकरणातील रुग्ण ७६९६

एकूण उपचार सुरू असलेले : ११७१६

Web Title: 35 corona deaths in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.