२६५ अल्पवयीन मुली पळून गेल्या; पोलिसांना सापडल्या केवळ १९१!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST2021-07-28T04:16:53+5:302021-07-28T04:16:53+5:30

जळगाव : जिल्ह्यातून वेगवेगळ्या कारणांनी दीड वर्षात २६५ अल्पवयीन मुली बेपत्ता झालेल्या आहेत. त्यापैकी १९१ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना ...

265 minor girls fled; Police found only 191! | २६५ अल्पवयीन मुली पळून गेल्या; पोलिसांना सापडल्या केवळ १९१!

२६५ अल्पवयीन मुली पळून गेल्या; पोलिसांना सापडल्या केवळ १९१!

जळगाव : जिल्ह्यातून वेगवेगळ्या कारणांनी दीड वर्षात २६५ अल्पवयीन मुली बेपत्ता झालेल्या आहेत. त्यापैकी १९१ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ७४ मुलींचा अद्यापही शोध सुरू आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत ८८ मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी ३९ मुली मिळून आलेल्या आहेत. कोरोना काळात अनेक निर्बंध आल्याने, अल्पवयीन मुली घरातच लॉक झाल्या आहेत. बाहेर फिरण्यावर बंधने आल्याने, या वर्षी मुली बेपत्ता होण्याचा आकडा कमी आहे.

अल्पवयीन मुलगी हरविलेली किंवा पळवून नेलेली असली, तर त्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. बहुतांश प्रकरणांत महिला व मुली या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत रफूचक्कर झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस दप्तरी मात्र, अशा प्रकरणात अपहरणाचा आकडा मोठा दिसतो, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असते. दरम्यान, पालकासोबत न गेलेल्या अल्पवयीन मुलींना शासकीय निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातून मुलींसोबतच ६५८ मुलेही बेपत्ता झाली आहेत. त्यात १८ वर्षांच्या आतील ६५ मुलांचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्यापैकी ३२३ मुलांचा शोध लागलेला आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यात जिल्ह्यातून पलायन केलेल्या ८८ पैकी ३९ मुलींचा शोध लागला आहे, तर ४९ मुलींचा शोध अद्याप लागलेला नाही. गेल्या वर्षीही १७७ मुली बेपत्ता झाल्या होत्या, त्यापैकी १५२ मुलींचा शोध लागला होता, तर १२५ मुलींचा शोधच लागला नाही.

लॉकडाऊन व कोरोना, यामुळे मुली बेपत्ता होण्याचे किंचित प्रमाण घटले आहे. कोरोनामुळे बाहेर जिल्हा व इतर राज्यांत तपासाला जायला अडचणी येऊ लागल्या. राज्य सोडून जायचे असेल, तर त्यासाठी पोलीस अधीक्षकांची परवानगी लागते. कोरोना काळात बस व रेल्वेसेवा बंद असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही मुलींकडे मोबाइलच नसल्याने तपासाच्या दृष्टिकोनातून आणखी अडचणी निर्माण होऊ लागल्या.

अल्पवयीन मुली बेपत्ता

२०१८ -१७०

२०१९-१८८

२०२०-१७७

२०२१ (मेपर्यंत) -८८

मुली चुकतात कुठे!

उदाहरण १

वयाच्या १४व्या वर्षापासून चांगले काय वाईट काय, याची समज मुलींना असते. सहकारी मैत्रीण यांची संगत कशी आहे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या घरातील वातावरण व बाहेरील वातावरण याचा परिणाम मुलींवर होतो. या वयात मुली मैत्रिणींचेच जास्त ऐकतात. कुटुंबाने सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. अशामुळे अल्पवयीन मुली वासनेच्या शिकार झाल्याच्या घटना जळगाव शहरात घडलेल्या आहेत. सहकारी मित्रांनी ब्लॅकमेलिंक करून या कृत्यास भाग पाडल्याचे उदाहरणे आहेत.

उदाहरण २

मुलींनी मोबाइलचा वापर कमी करावा. आई, वडील यांच्याशी पालक यापेक्षा मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत. बाहेर जे काही घडत असेल, त्याची प्रत्येक गोष्ट घरी सांगितली पाहिजे, नेमके हेच मुलींकडून होत नाही. बाहेर काही चुकीचे घडले असेल, तर भीतिपोटी मुली सांगत नाही, उलट सांगितले, तर पुढचे संकट टाळता येतात.

उदाहरण ३

जळगाव शहरातील एका प्रकरणात मुलीची ओळख गल्लीतील मुलासोबत झाली. त्यातून मैत्री झाली. या मैत्रीतून बाहेर फिरणे-हिंडणे झाले. मुलीच्या मनात किंचितही वाईट हेतू नव्हता. मुलाने दोघं एकत्र असल्याचे फोटो मित्राला काढायला लावले. पुढे हेच फोटो कुटुंबात दाखविण्याची धाक दाखवून त्याने मुलीशी जबरदस्तीने अनैतिक संबंध प्रस्थापित केले. आधीच हा प्रकार मुलीने घरी सांगितला असता, तर घटना टळली असती.

मुला-मुलीचे चुकीचे पाऊल पडू नये, म्हणून व्हा त्यांचे मित्र !

-मुला-मुलींशी प्रत्येक पालकाने मैत्री करावी. प्रत्येक गोष्ट, सभोवताली घडणाऱ्या घटना, चांगले, वाईट हे त्यांना समजावून सांगावे. कोणताच संकोच मनात बाळगू नये.

-अल्पवयात मुला-मुलींना समज कमी असते. बाहेरील मित्र-मैत्रिणी यांच्याशी जास्त वेळ गप्पा होत असल्या, तर त्याबाबत त्यांना समजावून सांगितले पाहिजे. एखाद्या मुलाचे, मुलीचे पाऊल चुकीचे पडत असेल, तर लगेच लक्षात येते. त्याबाबत त्यांना प्रेमाने व मैत्रीच्या नात्याने समजावून सांगणे केव्हाही चांगले.

-वयाच्या १५ वर्षांनंतर मुला-मुलींमध्ये बदल जाणवतो. मोबाइलचा अति वापर केव्हाही टाळला पाहिजे. मुलांना ते समजावून सांगावे. ऑनलाइन अभ्यासाच्या व्यतिरिक्त मोबाइल हाताळू देऊ नये. मोबाइल का जास्त वापरू नये, त्याची काही उदाहरणे देऊन मुलांना ते पटवून सांगितले पाहिजे.

- आईने मुलीशी तर वडिलांनी मुलांशी खुलून गप्पा केल्या, तर ते त्यांच्या नजरेसमोर घडणाऱ्या घटना, घडामोडी पालकांना सांगतात. नेमकी काय चूक झाली, कशामुळे झाली, हे आपण त्यांना समजावून सांगू शकतो.

Web Title: 265 minor girls fled; Police found only 191!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.