८० गाव पाणी योजनांचे २४ कोटी ‘पाण्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:19 IST2021-09-18T04:19:05+5:302021-09-18T04:19:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील ८० गाव सामुदायिक पाणीपुरवठा योजनांची दहा तालुक्यांमध्ये तब्बल २४ कोटींची थकबाकी असल्याचा मुद्दा ...

24 crore of 80 village water schemes 'in water' | ८० गाव पाणी योजनांचे २४ कोटी ‘पाण्यात’

८० गाव पाणी योजनांचे २४ कोटी ‘पाण्यात’

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील ८० गाव सामुदायिक पाणीपुरवठा योजनांची दहा तालुक्यांमध्ये तब्बल २४ कोटींची थकबाकी असल्याचा मुद्दा समोर आला आहे. ग्रामसेवकांकडून ७० टक्क्यांपेक्षा अधिक वसुली दाखविली जात असताना इतकी मोठी थकबाकी कशी, असा प्रश्न आता उपस्थित केला जात असून वसुलीकडे दुर्लक्ष झाल्याने यात नेमकी वस्तुस्थिती काय? अशी विचारणा आता जि. प. सदस्यांमधून होत आहे. यात बोदवड तालुक्यात सर्वाधिक ७, तर भुसावळ तालुक्यात ५ कोटी रुपये थकलेले आहेत.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या पाणी योजना राबविण्यात आल्या. प्रत्यक्ष नागरिकांकडून ग्रामपंचायतींनी वसुली केली. मात्र, ती जि.प.कडे भरलेलीच नाही. बहुतांश योजना या वीज बिल थकल्याने बंद आहेत. देखभाल दुरुस्ती नाही, अशा परिस्थितीत ही केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहत असल्याचे समोर येत आहेत. स्थायी समितीच्या सभेत या मुद्द्यावर मोठी खडाजंगी झाली होती. यात बोदवड तालुक्यात सर्वाधिक ७ कोटी रुपये थकले आहेत.

जनता पाण्यापासून वंचित : नानाभाऊ महाजन

एकीकडे ७० टक्क्यांपेक्षा कमी वसुली असेल तर ग्रामसेवकांना पदावर राहता येत नाही. त्यामुळे वसुलीही ७० टक्क्यांपेक्षा अधिकच असते. असे असताना पाणी योजनांची ऐवढी थकबाकी असणे याचा अर्थ ग्रामसेवकांनी हा पैसा भरलेलाच नाही. त्यामुळे यंत्रणेकडूनच यंत्रणेची ही फसवणूक असल्याचा आरोप शिवसेना सदस्य नानाभाऊ महाजन यांनी केला आहे. या दुर्लक्षामुळे योजनांचे वीज जोडणी तोडण्यात आली असून जनता पाण्यापासून वंचित आहे. याला गटविकास अधिकारी व ग्रामसेवक जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

८० कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

पाणीपुरवठा योजनांवर कार्यरत ८० कर्मचाऱ्यांना कुठलाच लाभ मिळालेला नसून त्यांचे वेतनही थकले आहे. या कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती येऊन ठेपल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. वर्षानुवर्षे ही वसुली होत नसल्याने या कर्मचाऱ्यांचे पगार हे सेस फंडातून जेवढी तरतूद तेवढेच होत आहे. त्यात काही महिन्यांचे वेतन मिळते, तर अनेक महिन्यांचे रखडते. त्यामुळे त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

अशी आहे तालुकानिहाय थकबाकी

रावेर तालुका ३८ लाख ४७ १५०

पारोळा : ९१ लाख ५४ हजार ५११

जामनेर : १ कोटी ४२ लाख ४ हजार ७२९

चाळीसगाव : २७ लाख ७८ हजार ६७

बोदवड : ७ कोटी ७७ लाख १ हजार २०३

मुक्ताईनगर : २२ लाख ७०८

एरंडोल : ३ कोटी ६० हजार ९६४

भुसावळ : ५ कोटी ५८ लाख ८ हजार ८५०

वरणगाव : १ कोटी ५३ लाख ४२ हजार ३६५

जळगाव : ३ कोटी ४ लाख ८२ हजार ५९९

कोट

तालुकास्तरावर कॅम्प लावून याबाबत गटविकास अधिकाऱ्यांमार्फत वसुलीचे सोमवार ते मंगळवारपासून नियोजन करण्यात येणार आहे. यातील काही योजना सुरू आहेत.

-गणेश भोगावडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Web Title: 24 crore of 80 village water schemes 'in water'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.