Jalgaon Crime: जळगावात दहा दिवसांपूर्वी एका २३ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता आणखी एका २२ वर्षीय महिलेने सासरच्या जाचामुळे आपली जीवनयात्रा संपवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला पाच महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे एकाच वेळी दोन जीवांचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जळगावात सासत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे चिंतेंचे वातारवण निर्माण झालं आहे.
चाळीसगाव तालुक्यातील शिरसोली इथे माहेरी आलेल्या २२ वर्षीय गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. प्रतीक्षा चेतन शेळके (वय २२) असे या मयत विवाहितेचे नाव असून, ती पाच महिन्यांची गर्भवती होती. गर्भपातासाठी सासरच्यांकडून सतत दबाव टाकला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतही प्रतीक्षाने हाच आरोप केला आहे.
गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आई-वडील शेतात गेले असताना प्रतीक्षाने घरातच गळफास घेतला. शेतातून परतल्यानंतर वडील भागवत धामणे यांनी दरवाजा आतून बंद असल्याचे पाहिले. त्यांनी आवाज दिला पण कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे वडिलांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये प्रतीक्षाने गळफास घेतल्याचे दिसले. वडिलांनी तातडीने प्रतीक्षाला खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रतीक्षाचा विवाह दीड वर्षापूर्वी चेतन शेळके याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर ती पतीसोबत पुण्यात राहत होती. गर्भवती असल्याने गेल्या एका महिन्यापासून ती शिरसोली येथे माहेरी आली होती. याच दरम्यान तिने टोकाचं पाऊल उचललं.
दरम्यान, प्रतीक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यात तिने गर्भपातासाठी पती, सासू, सासरे, मावस सासू आणि मावस सासऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याचे म्हटलं आहे. या त्रासाला कंटाळून आणि होणाऱ्या मारहाणीमुळे ती तणावात होती, ज्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले, असेही तिने चिठ्ठीत स्पष्ट केले. दुसरीकडे, प्रतीक्षाच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरकडील मंडळी तिला सतत त्रास देत होती आणि गर्भपात करण्यासाठी दबाव आणत होती. याच त्रासाला कंटाळून तिने हे कृत्य केले असावे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पुढील तपास सुरू आहे.