जिल्ह्याला कोविशिल्डचे पुन्हा १९ हजार डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:52 IST2021-02-05T05:52:21+5:302021-02-05T05:52:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यासाठी उर्वरित १९ हजार डोसेस जिल्ह्याला प्राप्त ...

19,000 doses of Kovishield to the district again | जिल्ह्याला कोविशिल्डचे पुन्हा १९ हजार डोस

जिल्ह्याला कोविशिल्डचे पुन्हा १९ हजार डोस

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यासाठी उर्वरित १९ हजार डोसेस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. यात पूर्ण २० हजार कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी दोन डोसचे नियोजन पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. रविवारी हे डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. दरम्यान, आणखी सहा केंद्रांची वाढ करण्यात आली असून, रविवारी या केंद्रांवर ड्राय रनही घेण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले. सोमवारी ८६७ लाभार्थींनी लस घेतली.

जिल्ह्यात सुरुवातीला सात केंद्रांवर सातशे कर्मचारी एका दिवसात असे नियोजन करण्यात आले होते. लाभार्थी वाढावे, लसीकरण अधिक झपाट्याने पूर्ण व्हावे, यासाठी पुन्हा सहा केंद्रांची यात भर पडली आहे. जिल्ह्याला अधिकचे डोस उपलब्ध झाल्यानंतर ही केंद्र वाढविण्यात आली आहेत. यात मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय, अमळनेर, पाचोरा, रावेर, यावल येथील ग्रामीण रुग्णालय आणि गोल्ड सिटी या खासगी रुग्णालयात हे लसीकरण केले जात आहे. सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका कर्मचाऱ्याला रिॲक्शन आली. मात्र, ती सौम्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

खासगीवरच मनपाची मदार

महापालिकेअंतर्गत अनेक शासकीय कर्मचारी अद्याप लसीकरणाचे बाकी आहेत. मात्र, ते समोर येत नसल्याने खासगी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. सोमवारी गाजरे रुग्णालय व गोल्ड सिटी रुग्णालयात अनुक्रमे ७६ व ९६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. मात्र, हे सर्व खासगी यंत्रणेतील डॉक्टर व कर्मचारी होते. शासकीय कर्मचारी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. शिवाय जागा नसल्याने खासगी रुग्णालयात केंद्र सुरू करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

असे झाले लसीकरण

जीएमसी ७०, जामनेर ६६, चोपडा ९३, मुक्ताईनगर ५८, चाळीसगाव ९५, पारोळा ३१, भुसावळ ५५, अमळनेर ७०, पाचोरा ५०, रावेर ४८, यावल ५९, गाजरे हॉस्पिटल ७६, गोल्ड सिटी हॉस्पिटल ७६

कोट

१९ हजार डोसेस प्राप्त झाले आहेत. अजूनही डोसेस येणार असून, सर्व कर्मचाऱ्यांना यात लस दिली जाणार आहे. लस घेतल्यानंतर सौम्य रिॲक्शन येणे हे पॉझिटिव्ह लक्षण आहे. अद्याप जिल्ह्यात एकालाही गंभीर रिॲक्शन आलेले नाही. हळूहळू आरोग्य कर्मचारी आता लसीकरणाला पुढे येत आहेत.

- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: 19,000 doses of Kovishield to the district again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.