15-year-old son dies after being hit by a well in Shirsad in Yaval taluka | यावल तालुक्यातील शिरसाड येथे विहिरीत तोल जाऊन १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
यावल तालुक्यातील शिरसाड येथे विहिरीत तोल जाऊन १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

ठळक मुद्देशेतात ठिबक नळ्या लावताना घडली घटनाडोक्याला जबर मार लागल्याने त्याचा विहिरीतच दुर्दैवी अंत

साकळी, ता.यावल, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या शिरसाड येथे गावालगतच्या शेतात ठिबक नळ्या लावताना विहिरीत तोल गेल्याने रवींद्र संजय अलकरी (राजपूत) या १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना १२ रोजी सकाळी घडली.
सूत्रांनुसार, शिरसाड येथील गावालगत वासुदेव सोमा टेकडे (रा.भालोद) यांच्या शेतामध्ये १२ रोजी सकाळी साडेआठचया दरम्यान मजुरांकडून ठिबक नळ्या लावण्याचे काम चालू होते. यावेळी रवींद्र संजय अलकरी (राजपूत) (वय-१५) याच्यासह सागर बारेला रा.बोरावल व करण भिलाला रा.बनूर, मध्य प्रदेश या दोघा मजुरांसोबत शेतात ठिबक नळ्या लावण्याचे काम करीत होता. नळ्या ओढण्याचे काम करीत असताना रवींद्र जवळच असलेल्या विहिरीत एकदम तोल जाऊन पडला. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा विहिरीतच दुर्दैवी अंत झाला. त्याचा पायही मोडला गेलेला होता.
या घटनेची वार्ता कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत उतरणाऱ्यांच्या मदतीने मयत रवींद्रचे शव विहिरीतून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. साकळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी यावल ग्रामीण रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन केले. उशिरापर्यंत यावल पोलिसात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. अचानक घडलेल्या घटनेने गावपरिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
रवींद्रच्या पश्चात आई, वडील, दोन मोठ्या बहिणी, एक लहान भाऊ असा परिवार आहे. तो शालेय शिक्षण घेत होता. त्याचा घरची परिस्थिती अतिशय नाजूक असून आई-वडील शेतमजुरी करतात.


Web Title: 15-year-old son dies after being hit by a well in Shirsad in Yaval taluka
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.