शासनाचा निर्णय : नागरिकांना मिळणार दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४ हजार ६३० जणांवर जिल्ह्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते, आता हे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या लोकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बहुतांश जणांनी जागेवरच दंड भरलेले होते तर काही जणांचे प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आले होते.
मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर २५ मार्च पासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. एप्रिल ते ऑगस्ट या काळात कडक लॉकडाऊन होते. विना परवानगी बाहेर फिरायलाही तेव्हा बंदी होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना बंद होत्या. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठीच हा नियम लागू करण्यात आला होता. ज्या लोकांनी नियमांचे उल्लंघन केले, त्यांच्यावर प्रशासनाने कलम १८८, जमावबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. याअंतर्गत जागेवर दोनशे रुपयांचाही दंड आकारण्यात आला होता. दुकानदारांवर कारवाया करुन त्यांचे प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली होती. विना पास प्रवास करणाऱ्या लोकांवर तसेच वाहनांवरही कारवाया करण्यात आल्या. त्या काळात जिल्ह्यात ३१ ठिकाणी सिमा तपासणी नाके उभारण्यात आली होती.
विना परवानगी बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक
१) परवानी नसताना अनावश्यकरित्या घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक होते. ९ हजार ८३६ जणांवर कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या लोकांकडून दोनशे रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. त्याशिवाय पास नसतानाही एका तालुक्यातून, जिल्ह्यातून दुसऱ्या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या १ हजार १६२ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांची वाहने जप्त करण्यात आली होती.
२) लॉकडाऊन काळात एकूण १४ हजार ६३० जणांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून २० लाख ३६ हजार ११८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. काही जणांनी न्यायालयात दंड भरला आहे.
३) याशिवाय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शहरातून एक लाखापेक्षा जास्त वाहने गेली. सर्वाधिक वाहने ही राष्ट्रीय महामार्गावरुन गेली. राज्यमार्गाचाही वापर काही वाहनधारकांनी केला. शासनाने आदेश दिल्यानंतर आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून या वाहनांना अडविण्यात आले होते. नंतर शासनाच्या बसेस मधून प्रवाशांना दुसऱ्या राज्याच्या सिमेपर्यंत पोहचविण्यात आले.
कोट...
गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शासनाचे आदेश अजून तरी प्राप्त झालेले नाहीत. प्रस्ताव न्यायालयात पाठवायचा की शासनाकडे हे देखील शासनच ठरविणार आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसारच पुढील कारवाई केली जाईल.
-चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक
लॉकडाऊन काळात दाखल गुन्हे : १४६३०
विना परवानगी घराबाहेर पडणे : ९८३६
जास्त वेळ दुकान सुरु ठेवणे : ७८२
विना परवानगी प्रवास करणे : ११६२
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे : २८५०