‘बीएचआर’ची मालमत्ता घेणारे १०० जण पोलिसांच्या रडारवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST2020-12-04T04:42:45+5:302020-12-04T04:42:45+5:30

पोलिसांनी केलेल्या तपासात मालमत्ता खरेदी-विक्रीतही मोठा घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. बनावट वेबसाईटच्या माध्यमातून सुनील झंवर व इतरांनी ज्या ...

100 BHR property owners on police radar! | ‘बीएचआर’ची मालमत्ता घेणारे १०० जण पोलिसांच्या रडारवर!

‘बीएचआर’ची मालमत्ता घेणारे १०० जण पोलिसांच्या रडारवर!

पोलिसांनी केलेल्या तपासात मालमत्ता खरेदी-विक्रीतही मोठा घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. बनावट वेबसाईटच्या माध्यमातून सुनील झंवर व इतरांनी ज्या मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत, त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्याशिवाय ज्या मालमत्ता अधिकृत वेबसाईटवरील निविदांच्या माध्यमातून खरेदी व विक्री झालेल्या आहेत, त्यादेखील संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या सर्व मालमत्तांची दुय्यम निबंधक कार्यालयातही नोंदी तपासल्या जाणार आहेत. जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, शेंदुर्णी, पुणे, हवेली, नागपूर, फलटण, जि.सातारा, लातूर, सांगवी, जि.पुणे, देऊळगाव माही, जि.बुलडाणा, बारामती, शिरुर, जि. पुणे, कुसुंबा, ता.जळगाव,भुसावळ, टोणगाव, भडगाव यासह इतर ठिकाणच्या मालमत्ता खरेदी संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. अशा शंभर जणांची यादी पोलिसांनी काढली आहे.

नोटिसीचा एकच नमुना, खाडाखोड

मालमत्ता विक्रीबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. ज्यांनी निविदा भरल्या होत्या, त्यांना नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या. या सर्वांच्या नोटिसांचा नमुना एकसारखाच आहे. त्यातही जावक क्रमांकामध्ये खाडाखोड, अवसायकाच्या सह्यांमध्ये तफावत आहे. एकदा निविदा मंजूर झालेली असेल तर अनामत रक्कम परत देता येत नाही, असा नियम असताना मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना देण्यात आलेल्या नोटिसांमध्ये फिक्स डिपॉझिटच्या पावत्याऐवजी १०० टक्के रक्कम डीडी अथवा आरटीजीएसद्वारे भरावेत व नोटीस मिळाल्यापासून ४५ दिवसाच्या आता खुलासा सादर केला नाही तर निविदेची अनामत रक्कम परत करून निविदा रद्द करण्याचा इशारा देण्यात आला होता. ज्यांनी निविदा भरलेल्या होत्या, त्यातील बहुतांश जणांनी फिक्स डिपॉझिट ठेवली होती व ३० टक्के रक्कम डीडी व ७० टक्के रक्कम संस्थेत ठेवलेल्या फिक्स डिपॉझिटमधून घेण्याबाबत मालमत्ता खरेदीदारांनी कळविले होते; परंतु संस्थेने त्यांची ही मागणी फेटाळली होती. याचाच अर्थ ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या रकमेबाबत कुठलीही शाश्वती देण्यात येत नव्हती. अशा प्रकारे निविदा रद्द करून बनावट वेबसाईटच्या माध्यमातून त्या जवळच्या लोकांना कवडीमोल भावात विक्री करण्याचा धंदाच संस्थेने केल्याचे उघड झाले आहे.

अटकेतील आरोपींकडून तपासात असहकार्य

या प्रकरणात अटक करण्यात आलेले सुजीत वाणी, विवेक ठाकरे, धरम साखला, महावीर जैन व कमलाकर कोळी या पाच जणांकडून तपासात सहकार्य केले जात नसून, उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जप्त कागदपत्रे, संगणक, हार्डडिस्क याच्यातून बऱ्यापैकी माहिती पोलिसांना मिळाली आहे. या गुन्ह्यात अटक झालेल्यांच्या नातेवाइकांच्या मालमत्तेचीदेखील चौकशी केली जाणार आहे. नातेवाईक, नोकरदार व जवळच्या मित्राच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्याचा संशय पथकाला आहे.

Web Title: 100 BHR property owners on police radar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.