युवकाचा दगडाने ठेचून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:27 IST2019-06-16T00:27:43+5:302019-06-16T00:27:59+5:30
एका २४ वर्षीय युवकाचा दगड, लाकडी फळीने ठेचून खून केल्याची घटना पारध (ता.भोकरदन) शिवारात घडली.

युवकाचा दगडाने ठेचून खून
लोकमत न्यूज नेटवर्क
पारध : एका २४ वर्षीय युवकाचा दगड, लाकडी फळीने ठेचून खून केल्याची घटना पारध (ता.भोकरदन) शिवारात घडली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी समोर आली असून, याप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मयत युवक हा मासरूळ (जि.बुलडाणा) येथील आहे.
पारध येथील प्रभू दामू सुरडकर हे शुक्रवारी सायंकाळी शेतातून घरी येत होते. त्यावेळी श्रीरंग दगडू सुरडकर यांच्या शेतातील बांधावरील एका झाडाखाली त्यांना एका युवकाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ पारध पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. पो.ना. नारायण माळी, प्रकाश सिनकर, पो.हे.कॉ. गीते यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती वरिष्ठांना दिली.
दोन युवकांनी बोलावून नेले
स्वप्नील शुक्रवारी पंढरीच्या वारीवरून गावाकडे परतला होता. जेवणानंतर तो शेतात गेला. दुपारच्या सुमारास दुचाकीवर घरी आलेल्या दोघांनी स्वप्नीलची विचारपूस केली. ‘पारध येथील कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायचे आहे. त्याची कॉलेजमध्ये ओळख असल्याने त्याला घेण्यासाठी आल्याचे सांगत शेतातून स्वप्नीलला सोबत नेल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
चार संशयित ताब्यात
मासरूळ येथील युवकाच्या खून प्रकरणात पारध पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. यात पारध (ता. भोकरदन) येथील एक, वालसावंगी (ता. भोकरदन) येथील एक आणि चांदई (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील दोघांचा समावेश आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.