Video यळकोट यळकोट! जागरण गोंधळात रावसाहेब दानवेंची तुणतुणे वाजवत वाघ्यामुरळीला साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 15:56 IST2022-05-03T15:55:17+5:302022-05-03T15:56:22+5:30
जागरण गोंधळात रावसाहेब दानवेंचा गावरान बाणा; तुणतुणे वाजवून म्हटले देवीचे गाणं

Video यळकोट यळकोट! जागरण गोंधळात रावसाहेब दानवेंची तुणतुणे वाजवत वाघ्यामुरळीला साथ
राजूर ( जालना) : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्वतः हातात तुणतुणे घेऊन जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात जोशपूर्ण सहभाग घेतल्याच्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ भोकरदन तालुक्यातील खामखेडा येथील रविवारी झालेल्या कार्यक्रमातील आहे. केंद्रीय मंत्री असूनही रावसाहेब दानवे यांनी जपलेल्या ग्रामीण संस्कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रावसाहेब दानवे यांचा अस्सल मराठी बाणा सर्वत्र परिचित आहे. केंद्रीय मंत्रीपदाचा किंवा खासदारकीचा बडेजाव न दाखवता सर्वसामान्यांत मिसळून होणे हा त्यांचा स्वभाव. याची प्रचीती पुन्हा एकदा रविवारी माजी उपसभापती गजानन नागवे यांनी आयोजित केलेल्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात आली. रात्री साडेदहा वाजता मंत्री दानवे यांची या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यावेळी वाघ्या मुरळीचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता.
यळकोट यळकोट,जय मल्हार; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तुणतुणे वाजवत दिली वाघ्यामुरळीला साथ pic.twitter.com/fhbOmz8x0T
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) May 3, 2022
कोरोनानंतर होणाऱ्या अस्सल मराठी जागरण गोंधळाचा कार्यक्रम पाहून मंत्री दानवे सुद्धा मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाले. ऐवढेच नाही तर त्यांनी सरळ हातात तुणतुणे घेत वादन सुरु केले. यळकोट यळकोट, जय मल्हार या गाण्यावर ताल धरून वाघ्यामुरळीच्या पथकाला मंत्री दानवे यांनी साथ दिली. यामुळे कार्यक्रमात मोठी रंगत आली होती. यावेळी मंत्री दानवे म्हणाले, ग्रामस्थांसाठी जागरण गोंधळ असे कार्यक्रम मनोरंजनाचा भाग आहेत. मी सुध्दा लहानपणापासून आजूबाजूच्या खेडयात जागरण गोंधळ असला की संवगडयासह हजरी लावायचो.